Keerthy Suresh : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अभिनेत्रीने दोन महिन्यांपूर्वी ती लग्न करणार असल्याचे संकेत दिले होते, तेव्हापासून ती कुणाला डेट करत आहे? कुणाशी लग्न करणार? तसेच ती लग्न कधी करणार? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात येऊ लागले. अशात अभिनेत्रीने आता स्वत: तिच्या लग्नाबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केव्हा करणार लग्न?

अभिनेत्री कीर्ती सुरेश याच वर्षी लग्न करणार आहे. तिने स्वत: याबद्दल माहिती देत ती पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच तिने लग्न कुठे करणार याचीही माहिती दिली आहे. अभिनेत्रीने स्वत: लग्नाची माहिती दिल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. तसेच सोशल मीडियावर अनेक जण तिचे अभिनंदन करत आहेत.

हेही वाचा : Video : रेश्मा शिंदेने घेतला हिंदी उखाणा! ‘रंग माझा वेगळा’च्या टीमने लग्नात केली धमाल, नवरा-नवरीच्या दाक्षिणात्य लूकने वेधलं लक्ष

‘या’ ठिकाणी करणार लग्न

आज कीर्ती तिच्या आई-वडिलांसह आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात आली होती. येथे तिने कुटुंबीयांसह देवाचं दर्शन घेतलं. तसेच दर्शन घेऊन ती बाहेर आली तेव्हा तिने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने गोव्यात लग्न करणार असल्याचं सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाली कीर्ती?

दर्शन घेऊन बाहेर आल्यावर कीर्ती म्हणाली, “माझा आगामी चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी मी देवाच्या दर्शनाला आले होते. मी पुढच्या महिन्यात गोव्यामध्ये लग्न करणार आहे.”

अँटनी थट्टिलबरोबर करणार लग्न

कीर्ती सुरेश गेल्या अनेक वर्षांपासून बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलला डेट करत आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेत्रीने सोशल मीडियावर अँटनी थट्टिलबरोबर एक फोटो पोस्ट केला होता. तसेच यावर कॅप्शन लिहिले, “१५ वर्षे आणि कायम…” कीर्ती सुरेश आणि अँटनी थट्टिल या दोघांचा फोटो पाहून सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी त्यांना अभिनंदन केलं आहे. दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून डेट करतात. मात्र, अभिनेत्रीने आतापर्यंत यावर काहीही स्पष्ट मत दिलं नव्हतं.

हेही वाचा : नाना पाटेकरांनी अंकशास्त्रावर विश्वास असलेल्या स्पर्धकाला विचारले असे प्रश्न, तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला; पाहा Video

दरम्यान, कीर्ती सुरेशचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’ पुढील महिन्यात २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कीर्तीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला आजवर एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. तसेच सध्या ती ‘रिवॉल्वर रिता’ या आगामी चित्रपटाच्या कामातही व्यग्र आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South actress keerthy suresh confirms her wedding in goa with antony thattil rsj