भारतीय प्रॉडक्शन हाऊस पॅनोरमा स्टुडिओ आणि दक्षिण कोरियाच्या अँथॉलॉजी स्टुडिओने कान्स २०२३ चित्रपट महोत्सवादरम्यान भागीदारीची घोषणा केली. घोषणेच्या वेळी निर्माते कुमार मंगत पाठक आणि जय चोई उपस्थित होते. या भागीदारीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ‘दृश्यम’ या थ्रिलर फ्रँचायझीचा कोरियन भाषेत होणार रिमेक. आंतरराष्ट्रीय भाषेत ‘दृश्यम’चा रिमेक बनवण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ‘शीप विदाऊट अ शेफर्ड’ या नावाने चायनीजमध्ये याचा रिमेक करण्यात आला होता.
‘दृश्यम’ या चित्रपटाचा कोरिया रिमेक आणि अँथॉलॉजी स्टुडिओसोबतच्या भागीदारीबद्दल बोलताना कुमार मंगत म्हणाले, “दृश्यमचा रिमेक कोरियामध्ये बनत असल्यामुळे मी उत्साहित आहे. यामुळे भारताबाहेर त्याचा आवाका तर वाढेलच शिवाय हिंदी चित्रपटाची दखल जगभरात घेतली जाईल. इतकी वर्षे, आपण कोरियन चित्रपट पाहून प्रेरणा घेतली. आता त्यांना आपल्या चित्रपटांतून प्रेरणा मिळत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी यापेक्षा मोठी अभिमानास्पद बाब कोणती असू शकते.”
आणखी वाचा : “माझ्या जन्मानंतर वडिलांनी महिनाभर…” अभिनेत्री करिश्मा तन्नाने सांगितली ‘ती’ भयंकर आठवण
मल्याळम क्राईम थ्रिलर दृश्यममध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत आहे जो आयजीच्या मुलाच्या हत्येचा संशयित आहे आणि स्वतःला आणि त्याच्या कुटुंबाला पोलिसांपासून वाचवण्यासाठी त्याच्या बुद्धीच्या जोरावर एक मास्टरप्लॅन आखतो. पहिला चित्रपट २०१३ मध्ये आला होता, जो जीतू जोसेफ याने लिहिला आणि दिग्दर्शित केला होता.
नंतर या चित्रपटाचा चार वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात आला. हिंदीमधील रिमेकमध्ये अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना यांनी काम केलं आहे. याच्या दुसऱ्या भागाच्या हिंदी रिमेकलाही आपल्याइथे तगडा प्रतिसाद मिळाला.