दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदमुरी तारका रत्न हे नुकतेच एका पदयात्रेत सहभागी झाले होते. त्या यात्रेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने बेशुद्ध झाल्याचं वृत्त समोर येत आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या ते आयसीयुमध्ये आहेत. कुप्पम येथील केसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आता वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
तारका रत्न हे ‘आरआरआर’ स्टार ज्युनिअर एनटीआर यांचे बंधू आहेत. सुरुवातीला रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांची प्रकृती चिंताजनक होती, नंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्याचंसुद्धा डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय त्यांची प्रकृती आता चिंताजनक नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा : “त्याने तिहार जेलमध्ये मला फसवून आणलं अन्…” चाहत खन्नाचा कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरबद्दल धक्कादायक खुलासा
तारका रत्न यांचे नातवाईक आणि अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांनी मीडियाशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, “तारका रत्न यांची प्रकृती आता स्थिर आहे, डॉक्टर त्यांचे उपचार करत आहेत, त्यांनी आम्हाला त्यांना बंगळूर येथे हलवण्याचा सल्ला दिला आहे, आम्ही त्यावर विचार करत आहोत. ते लवकरच बरे होतील. परिवार आणि चाहते यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत.”
तारका रत्न यांनी २००२ च्या ‘ओकाटो नंबर कुराडू’ या तेलुगू चित्रपट अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. याबरोबरच ‘९ ओवर्स’ या वेबसीरिजमध्येसुद्धा त्यांनी काम केलं आहे. नंदामुरी तारका रत्न अचानकच रुग्णालयात दाखल झाल्याने नंदामुरी यांच्या असंख्य फॅन्सना चिंता लागून राहिली आहे. सगळेच त्यांच्या उत्तम तब्येतीसाठी प्रार्थना करत आहेत.