मराठी सिनेमांची संख्या ही पूर्वी पेक्षा झपाट्याने वाढत चालली असून अन्य भाषिक लोकही आता मराठी सिनेमांच्या निर्मिती तसेच दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे चित्र मराठी सिनेसृष्टीत पहायला मिळत आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे दक्षिणात्य युवा अभिनेता कार्तिक शेट्टी याची. आजवर युवा, कार्तिक, अग्निमुष्टी तसेच दक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेला “अक्षते” या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या कन्नड सिनेमांमधून कार्तिकने आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली आहे. आगामी “ठण ठण गोपाळ” या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
“ओम गणेश प्रॉडक्शन्स” या सिनेनिर्मिती संस्थेने “ठण ठण गोपाळ” सिनेमाची निर्मिती केली आहे. मुंबईत जन्म झालेल्या कार्तिक शेट्टी याने डिजिटल फिल्म अकॅडेमी येथून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असून हिंदी, कन्नड भाषिक नाटकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. अनेक दिवसांपासून दक्षिणेत प्रतीक्षेत असलेल्या “अक्षते” या कन्नड सिनेमाच्या शुटींग दरम्यान “ठण ठण गोपाळ” या सिनेमाची कथा मी माझ्या सहकाऱ्यांना ऐकवली आणि त्यांना ही ती खूप आवडली. आमचे दाक्षिणात्य सिनेमे हे बहुतांशी मसाला आणि अँक्शनपट असतात तर मराठीत उत्तम कथानक हे प्रेक्षकांना भावतात त्यामुळे मी हा सिनेमा मराठीत करण्याचे ठरविले. स्वतः फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याने तसेच आजवर केलेल्या कामांचा अनुभव पाठीशी असल्याने मी हा सिनेमा स्वतःच दिग्दर्शित करण्याचे ठरविले असे दिग्दर्शक कार्तिक शेट्टी याने सांगितले.
“ठण ठण गोपाळ” सिनेमाची कथा ही दृष्टी नसलेल्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची आहे. या मुलाची एका वारली चित्रकाराशी मैत्री होते आणि पुढे त्याच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळते त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. सिनेमाची कथा कार्तिक शेट्टी याची असून पटकथा कार्तिक शेट्टी, श्रीनिवास शिंदे आणि राहुल पोटे यांची तर संवाद वैभव परब यांचे आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. अदिती जहागीरदार यांनी लिहिलेल्या दोन गीतांना अमित शेट्ये या नवोदित संगीतकाराचे संगीत लाभले असून ही गाणी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत तर कॅमेरामन म्हणून मंजुनाथ नायक यांनी काम पाहिले आहे.
“ठण ठण गोपाळ” हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून येत्या ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन!
मराठी सिनेमांची संख्या ही पूर्वी पेक्षा झपाट्याने वाढत चालली असून अन्य भाषिक लोकही आता मराठी सिनेमांच्या निर्मिती तसेच दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे चित्र मराठी सिनेसृष्टीत पहायला मिळत आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 03-09-2015 at 13:53 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian actor debuting in marathi film industry as director