दिलीप ठाकूर
तुम्हालाही माहित्येय, दक्षिणेकडील चित्रपटाचे कलाकार (विशेषतः नायिका), निर्माता-दिग्दर्शक, संगीतकार वगैरे हिंदीत येतच असतात. तिकडच्या चारही भाषांतील चित्रपटाचे हिंदीत रिमेक होत असतात ( कधी उलटही होते. या माध्यम व व्यवसायात ती स्वाभाविक गोष्ट आहे.) पण अशा रिमेक चित्रपटाच्या चक्क मुहूर्तावरच काही प्रभाव जाणवावा? चित्रपटसृष्टीच्या भटकंतीत असे ‘फ्लेवर’ अर्थात अशा गोष्टी छान अनुभवास येतात. जीतेंद्रने अशा दक्षिणेकडील चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये जणू विक्रमी काम केलेय. असाच एक चित्रपट ‘सदा सुहागन’ (१९८६).
चेंबूरच्या आर. के. स्टुडिओतील त्याचा मुहूर्त आजही चांगलाच आठवतोय. त्या काळात असे चित्रपटाचे मुहूर्त म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीसाठी जणू मोठा सणच. त्यात जीतेंद्र व रेखा अशी सुपर हिट जोडी असेल तर अशा चित्रपटाच्या मुहूर्ताची गोडी आणखीनच वाढणार. निर्माते विजय सुरमा व दिग्दर्शक टी. रामाराव यांचा तमिळ चित्रपट ‘धीरजा सुमनगली’ या चित्रपटाचा हा रिमेक. दिग्दर्शक टी. रामाराव यानी अशाच दक्षिणेकडील अनेक चित्रपटाना हिंदीत आणले. (यह देश, इन्कलाब वगैरे) ते करताना मूळ चित्रपटातील भडकपणाही हिंदीत आणलाय. त्या काळात प्रेक्षकांना ते आवडे. मसालेदार मनोरंजक चित्रपट असेच भारी असावेत अशी जणू पब्लिकची भावना आणि अपेक्षा असावी. पण याच रिमेकची सुरुवात थेट मुहूर्तापासूनच व्हावी हे मात्र विशेषच म्हणायचे.
‘सदा सुहागन’च्या मुहूर्त दृश्यात पती-पत्नीमधील (अर्थातच जीतेन्द्र-रेखा) लाडिक वाद आणि मग त्याचा गोड शेवट असे दृश्य पाहतानाच जाणवत होते, हा प्रसंग दक्षिणेकडील चित्रपटात जास्त शोभेचा आहे. (हिंदीतही असे प्रसंग असतात. पण चित्रपटाचा मुहूर्तच अशा दृश्याने होत नसतो.) जीतेन्द्र-रेखा ही अनेक चित्रपटातून एकत्र काम केल्याने जमलेली छान केमिस्ट्री असल्याने यावेळेस त्यांच्या कामात सहजता आली त्यात विशेष ते काय म्हणा.
याच चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळची खास आठवण म्हणजे, माधुरी दीक्षितची उपस्थिती! क्षणभर विचारात पडलात ना, या चित्रपटात माधुरी कुठे आहे? ‘अबोध’पासून माधुरीची वाटचाल सुरु झाल्यावर तिने काही चित्रपटातून सहायक भूमिका स्वीकारल्यात. (मीनाक्षी शेषाद्री नायिका असणार्या ‘स्वाती’, ‘आवारा बाप’ या चित्रपटात माधुरी दुय्यम भूमिकेत होती हे माहित्येय?) पण माधुरीला ‘तेजाब’,’ राम लखन’, ‘त्रिदेव’ एकाच वेळेस मिळाले आणि तिने ‘सदा सुहागन’ सोडला. ती भूमिका अनुराधा पटेलने स्वीकारली. गोविंदाच्या प्रेयसीची ही भूमिका आहे. चित्रपटात उत्पल दत्त, शफी इनामदार, अरुणा इराणी, शुभा खोटे, मा. अलंकार, मोहन चोटी, शीला डेविड असे अनेक कलाकार आहेत. दक्षिणेकडील चित्रपटात अशा बऱ्याच व्यक्तिरेखा असतातच म्हणा. तिकडच्या जेवणाच्या थाळीत कशा अनेक वाट्या असतात तसेच हे.