दक्षिण कलाविश्वातून नुकतीच एक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका व गीतकार कल्पना राघवेंद्रने आत्महत्येद्वारे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा गायिकेने झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माहितीनुसार, गायिका तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. त्यामुळे तिला तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एबीपी देसमच्या वृत्तानुसार, गायिकेचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून गायिकेच्या घरात प्रवेश केला आणि मग तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

कल्पनाने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण काय? हे अद्याप समोर आलेले नाही. तथापि, केपीएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या त्या व्हेंटिलेटरवर आहेत आणि त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचीही माहिती मिळाली आहे. तसेच गायिकेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिचा पती प्रसाद हा घरी नव्हता. या घटनेनंतर तो शहरात पोहोचला असून, पोलिस अधिकारी सध्या त्याची चौकशी करीत आहेत.

कल्पना राघवेंद्रबद्दल सांगायचे झाले, तर ती दक्षिण संगीत क्षेत्रातली लोकप्रिय गायिका आहे. तिने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली. २०१३ पर्यंत तिने सुमारे १,५०० गाणी गायली आहेत. तिने भारतात आणि परदेशांत मिळून ३००० हून अधिक स्टेज शो केले आहेत. तसेच, तिने गेल्या काही वर्षांत इलायराजा आणि ए. आर. रहमान यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले आहे. कल्पना ही प्रसिद्ध पार्श्वगायक टी. एस. यांची मुलगी आहे. २०१० मध्ये स्टार सिंगर मल्याळम ही पदवी जिंकल्यानंतर कल्पनाला अधिक लोकप्रियता मिळाली.

गायक असण्याबरोबरच तिने अभिनयातही आपली चुणूक दाखवली आहे. ती दक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन स्टारर ‘पुन्नगाई मन्नन’ चित्रपटात एका छोट्या भूमिकेत दिसली होती. त्याशिवाय कल्पनाने ज्युनियर एनटीआरने होस्ट केलेल्या ‘बिग बॉस तेलुगू – सीझन १’मध्येही भाग घेतला होता. तसेच तिने रहमानचा मम्मनमधील ‘कोडी परकुरा कलाम’ आणि केशव चंद्र रामावतचा ‘तेलंगणा तेजम’ यांसह अनेक गायन रिअ‍ॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे.