साउथचे सुपरस्टार नागार्जुन गेल्या काही दिवसांपासून एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. नागार्जुन यांचे लाखो चाहते आहेत आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात. परंतु अभिनेत्याच्या एका चाहत्याला त्याच्या जवळ जाताच वाईट वागणूक मिळाली. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमुळे नागार्जुन यांना अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. यासाठी नागार्जुन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्वीट करत माफीदेखील मागितली. तरीसुद्धा त्यांच्यावर होणार ट्रोलिंग काही कमी नाही झालं. या व्हिडीओत नेमकं असं काय होतं? जाणून घेऊया.
नागार्जुन यांचा व्हायरल व्हिडीओ
नागार्जुन यांच्या चाहत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडीओमध्ये नागार्जुन विमानतळावर त्यांच्या बॉडीगार्डसह इच्छुक ठिकाणी जाताना दिसतायत. अभिनेता चालत असताना त्यांना भेटण्यासाठी एक दिव्यांग चाहता पुढे येतो. तो पुढे येताच नागार्जुन यांचे बॉडीगार्ड्स त्याला मागे ढकलताना दिसतायत. ढकलल्यानंतर तो दिव्यांग चाहता थोडा धडपडतो. हे घडल्यानंतरदेखील नागार्जुन काही प्रतिक्रिया न देता, त्यांच्या दिशेने चालत राहतात. या व्हिडीओत नागार्जुन यांच्यामागे अभिनेता धनुषदेखील चालताना दिसतोय.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागार्जुन यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर ट्वीट करीत या घटनेबद्दल माफीदेखील मागितली. नागार्जुन यांनी लिहिलं, “हे नुकतंच माझ्या निदर्शनास आलं. असं घडायला नको होतं. मी त्या गृहस्थाची माफी मागतो आणि भविष्यात असं होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेईन.”
हेही वाचा… “मला पाच-सहा वेळा कानाखाली मारलं”; ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला मिळाली होती वाईट वागणूक, म्हणाली…
अभिनेत्याने माफी मागितल्यानंतरही नकारात्मक कमेंट्स काही थांबल्या नाहीत. आता नागार्जुन प्रत्यक्ष त्या चाहत्याला भेटले आहेत. विमानतळावर जाताच नागार्जुन यांनी त्यांच्या दिव्यांग चाहत्याची गळाभेट घेतली आणि पापाराझींनी दोघांचे फोटो काढले. त्यावेळेस नागार्जुन त्यांच्या चाहत्याला म्हणाले की, “ही तुमची चूक नाही आहे.” अभिनेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
दरम्यान, नागार्जुन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘कुबेर’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात धनुष आणि रश्मिका मंदानादेखील प्रमुख भूमिकांत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.