दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा सध्या त्याच्या ‘पुष्पा २’मुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘पुष्पा २’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून त्याबद्दल रोज नवीन अपडेट समोर येत आहे. अभिनयाबरोबरच खऱ्या आयुष्यात अल्लू अर्जुन त्याच्या दिलदार स्वभावासाठी ओळखला जातो. त्याच्याबद्दल आता एक आणखी बातमी समोर आली आहे जी ऐकून कित्येकांच्या चेहेऱ्यावर आनंद दिसेल.
पीटीआयच्या वृत्तानुसार अल्लू अर्जुनने एका मुस्लिम मुलीच्या शिक्षणाची जवाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आहे. केरळच्या एका हुशार विद्यार्थिनीला अल्लूने मदतीचा हात पुढे केला आहे. केरळच्या अल्लपूजा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे. या मुलीचे वडील कोरोना काळात निधन पावले त्यामुळे अल्लूने तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
आणखी वाचा : “वैद्यकीय सल्ल्याशिवाय व्यायाम…” सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर विवेक अग्निहोत्री यांचं ट्वीट
खुद्द अल्लूने त्या मुलीला हे आश्वासन दिले आहे. तिला भविष्यात नर्स व्हायचं आहे आणि त्याचा कोर्स हा ४ वर्षांचा आहे. या ४ वर्षांचा शैक्षणिक खर्च अल्लू अर्जुन त्याच्या खिशातून करणार असल्याचं त्याने आश्वासन दिलं आहे. जिल्हाधिकारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार “ती मुलगी अल्लूला भेटली, तिला बारावीमध्ये ९२% मार्क मिळाले आहेत. तिला नर्स होऊन पुढचं उच्चशिक्षणदेखील घ्यायचं आहे, पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने मदत मागितली. तिच्यातील शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन आम्ही तिला मदत करायचे ठरवले.” ‘वी आर फॉर एलेप्पी परियोजना’ अंतर्गत तिला मदत करण्यासाठी तरतूद करण्यात आली आणि यासाठी अल्लू अर्जुनने खुल्या मनाने मदत करायचं जिल्हाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं आहे.