बॉलिवूड म्हणा किंवा कॉलिवूड आणि टॉलिवूड… इथे काम करणाऱ्या प्रत्येकालाच आपणही एकदा स्टार व्हावे असेच वाटते. इथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात काही स्वप्न असतात. साऱ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात असं नाही पण ज्यांची होतात ते इतिहास लिहितात. आता सुपरस्टार धनुषचंच घ्या ना. त्याने एक गायक म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. पण आज तो टॉलिवूडचा सुपरस्टार झाला. टॉलिवूड गाजवल्यानंतर त्याने बॉलिवूडलाही आपलं वेड लावलं. पण एवढ्यावरच थांबतोय तो धनुष कसला. आता त्याने आपला मोर्चा चक्क मराठी सिनेसृष्टीकडे वळवला आहे.

अमोल पाडवे दिग्दर्शित ‘फ्लिकर’ सिनेमासाठी धनुष आता चक्क मराठीत गाणं गाणार आहे. या सिनेमाला संगीताचे बादशहा इलियाराजा यांनी संगीत दिले आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. धनुष स्वतः इलियाराजा यांचा फार मोठा चाहता आहे. त्यांच्यासाठी गाणं गाण्याची इच्छा त्याने अनेकदा दर्शवली होती. शेवटी फ्लिकरच्या माध्यमातून धनुषची ही इच्छा पूर्ण झाली असेच म्हणावे लागेल.

धनुष नेमकी कोणतं गाणं गाणार आहे याबद्दल गुप्तता पाळण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी धनुषचं कोलावरी डी हे गाणं तुफान गाजलं होतं. त्यामुळे आता धनुष मराठीमधलं गाणं कसं गाईल याचीच उत्सुकता साऱ्यांना लागून राहिली आहे. धनुषचे सासरे थलैवा रजनीकांत स्वतः मराठी आहेत. पण मराठमोळ्या रजनीकांतला आता फारसं मराठी बोलता येत नाही. अशीच काहीशी अवस्था आहे त्यांच्या मुलीची म्हणजेच धनुषची बायको ऐश्वर्याचीसुद्धा. त्यामुळे धनुषला मराठीचे धडे कोण देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

३४ वर्षीय धनुषने २००२ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले. २०१३ मध्ये आलेल्या ‘रांझना’ सिनेमाने तर त्याने बॉलिवूडकरांचीही मनं जिंकली. धनुषच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ‘वादा चेन्नई’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये सध्या तो व्यग्र आहे. ‘वादा चेन्नईचा’ पहिला ट्रेलर २८ जुलैला प्रदर्शित करण्यात येणार असून सप्टेंबर महिन्यात त्याचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ‘वादा चेन्नई’ सिनेमानंतर तो ‘मारी- २’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. सध्या त्याची निर्मिती असलेला काला सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कामगिरी करत आहे. या सिनेमाशिवाय त्याचा हॉलिवूडपट ‘द एक्स्ट्राऑर्डिनरी जर्नी ऑफ दी फकीर’नेही तिकीटबारीवर चांगला ग्लला कमावला.

Story img Loader