दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांना नुकतंच रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त समोर येत आहे. मीडिया रीपोर्टनुसार २३ नोव्हेंबर या दिवशी कमल यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये काही तपासणी करण्यासाठी दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. कमल हासन यांना दैनंदिन तपासणीसाठी दाखल केलं असल्याचं स्पष्ट झालं, यामागे काहीही गंभीर कारण नसल्याचं समोर आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार कमल यांना ताप आला होता आणि त्यासाठी त्यांच्यावर उपचार आणि काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, शिवाय आजच त्यांना डिस्चार्जदेखील मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आणखी वाचा : “असा सीन कधीच…” दलिप ताहिल आणि जया प्रदा यांच्यातील रेप सीनबद्दल अभिनेत्याने सोडले मौन
नुकतंच कमल हासन यांनी दिग्दर्शक के. विश्वनाथ यांची हैदराबाद येथे भेट घेतली होती. तिथून परत आल्यावरच त्यांना ताप आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कमल यांची तब्येत अगदी ठणठणीत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. लोक त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
कमल हासन यांचा यावर्षी आलेला ‘विक्रम’ हा चित्रपट चांगलाच गाजला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाईदेखील केली. शिवाय ते सध्या ‘बिग बॉस तमिळ’ पर्व ६चं सूत्रसंचालनही करत आहेत. याबरोबरच कमल हे त्यांच्या ‘इंडियन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. कमल हासन हे पुन्हा एकदा बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शक मणीरत्नम यांच्याबरोबर काम करणार आहेत. त्यांच्या ‘केएच २३४’ या आगामी चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे.