गेल्या काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘एम्पुरान’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. काही दिवसांत मोहनलाल यांच्या या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला होता. या चित्रपटाच्या यशानंतर मोहनलाल सध्या विदेश वारी करत आहेत. या विदेश दौऱ्यात त्यांना आयुष्यातला एक अविस्मरणीय असा क्षण अनुभवता आला. अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनं सही केलेली जर्सी त्यांना मिळाली. याचा व्हिडीओ शेअर करत मोहनलाल यांनी अनुभव सांगितला आहे.
लिओनेल मेस्सीनं स्वतःच्या हाताने सही केलेली जर्सी पाहून मोहनलाल यांचा आनंद गगनात मावेना. या जर्सीबरोबर त्यांनी काही फोटो काढले. व्हिडीओमध्ये मेस्सी जर्सीवर ऑटोग्राफ देताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत मोहनलाल यांनी लिहिलं आहे, “आयुष्यातील काही क्षण इतके सुंदर असतात की ते शब्दात व्यक्त करता येत नाहीत. ते कायमच तुमच्याबरोबर असतात. आज, मी असाच एक क्षण अनुभवला. जेव्हा मी हळूहळू भेटवस्तू उघडत होतो, तेव्हा माझे हृदय धडधडत होतं. एक अशी जर्सी ज्यावर स्वतः दिग्गज लिओनेल मेस्सीनं सही केली होती. त्यानं माझं नाव त्याच्या स्वतःच्या हातानं लिहिलेलं होतं.”
पुढे मोहनलाल यांनी लिहिलं, “एक अशी व्यक्ती जिचं बऱ्याच काळापासून कौतुक केलं जात आहे; फक्त मैदानावरील खेळामुळे, हुशारीमुळे नाही तर मैदानाबाहेरील त्याच्या नम्रतेसाठी आणि शिष्टाचारासाठी कौतुक होतं आहे. हे खरोखर माझ्यासाठी खूप खास आहे. हा अविश्वसनीय क्षण माझे प्रिय मित्र डॉ. राजीव मँगोटिल आणि राजेश फिलिप यांच्यामुळे अनुभवता आला. मी तुमचे मनापासून आभारी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अविस्मरणीय भेटवस्तूसाठी देवाचे आभार.”
दरम्यान, मोहनलाल यांचा ‘एम्पुरान’ हा ब्लॉकबस्टर लुसिफरचा सीक्वल आहे. यामध्ये मोहनलाल खुरेशी अब्राम उर्फ स्टीफन नेदुम्पल्लीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर पृथ्वीराज सुकुमारनने झायेद मसूदची भूमिका पुन्हा साकारली आहे. हा चित्रपट मुरली गोपी यांनी लिहिला आहे. सध्या मोहनलाल आगामी प्रोजेक्टची तयारी करत आहेत. IMDBच्या माहितीनुसार, मोहनलाल यांच्याकडे १४हून अधिक प्रोजेक्ट्स आहेत. यामधील काही प्रोजेक्ट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत.