मल्याळम, तेलुगू चित्रपटसृष्टीप्रमाणेच सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकताच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेत तर या चित्रपटाने तूफान कमाई केली आहेच. आता हिंदीमध्येही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत आहे. सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत कित्येकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कन्नड भाषेत या चित्रपटाने केवळ ७ दिवसात ४० कोटींची कमाई केली आहे.
‘कांतारा’ हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. तसेच गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेल्या अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडायचा प्रयत्न केला आहे. सध्या या चित्रपटाला आयएमडीबी या साईटवर सर्वात जास्त रेटिंग मिळालं आहे. सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटानंतर ‘कांतारा’ हा दूसरा प्रादेशिक चित्रपट आहे ज्याला या साईटवर सर्वाधिक रेटिंग मिळालं आहे.
आणखी वाचा : हॅरी पॉटरचा ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड; रॉबी कॉलट्रेन यांचे ७२ व्या वर्षी निधन
नुकतंच दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास यानेही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे. या शुक्रवारी हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. तो पाहून प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून या चित्रपटाबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे. प्रभास लिहितो, “कांतारा हा चित्रपट दुसऱ्यांदा बघताना मिळालेला अनुभव हा फारच अविस्मरणीय होता. उत्तम संकल्पना आणि खिळवून ठेवणारा थरारक शेवट. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन प्रत्येकाने बघायलाच हवा.”
याआधी धनुषनेही या चित्रपटाची फार प्रशंसा केली होती. त्याने ट्वीट करत अभिनेता दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि चित्रपटाचे निर्माते यांचं कौतुक केलं होतं. ‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला त्याच्या मूळ कन्नड या भाषेत या प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी उचलून धरला. या चित्रपटाने सध्या तरी ९० कोटी इतकी कमाई केली आहे. याला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाला तेलुगू आणि हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला.