अखेर दाक्षिणात्य सुपरस्टार वरुण तेज व लावण्या त्रिपाठी आयुष्यभरासाठी एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत. काल दोघांनी सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. हा शाही लग्न सोहळा इटलीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन, राम चरण असे बरेच दाक्षिणात्य सुपरस्टार आपल्या कुटुंबीयांबरोबर इटलीमध्ये पोहोचले होते. वरुण व लावण्याच्या लग्नाचा पहिला फोटो, व्हिडीओ समोर आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरुण व लावण्याच्या लग्न सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू होती. कारण हा दाक्षिणात्यमधील शाही लग्न सोहळा आहे, ज्यामध्ये अनेक दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार पाहायला मिळाले. कॉकटेल पार्टी, हळद, मेहंदी अनेक समारंभ या लग्न सोहळ्यात पार पडले. सोमवारी कॉकटेल पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पांढऱ्या रंगाचा सॅटिन सूट आणि काळ्या रंगाच्या पॅन्टबरोबर बो-टाई या पेहरावात वरुण दिसला होता. तर लावण्या पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये पाहायला मिळाली होती.
हेही वाचा – Video: भीषण कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री जोशी आली समोर; पतीसह एका कार्यक्रमात झाली होती सहभागी
कॉकटेल पार्टीनंतर मंगळवारी हळद समारंभ पार पडला. यावेळी वर-वधुसह सगळ्या पाहुण्यांनी पिवळ्या रंगाचा पेहराव केला होता. वरुण पिवळ्या रंगाचा कुर्ता व पायजामामध्ये पाहायला मिळाला. तर त्याची पत्नी लावण्याने पिवळ्या रंगाची चोळी व पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला होता. यानंतर काल दुपारी २.४८ वाजता, या शुभ मुहूर्तावर वरुण व लावण्या लग्नबंधनात अडकले. लग्न सोहळ्यासाठी खास वरुणने पेस्टल रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर लावण्याने या खास दिवसासाठी लाल रंगाचा पोशाख निवडला होता.
हेही वाचा – ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार स्पृहा जोशी, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
दरम्यान, वरुणची पत्नी लावण्या ही देखील अभिनेत्री आहे. २०१७ साली ‘मिस्टर’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या तेलुगू चित्रपटादरम्यान दोघांची चांगली मैत्री झाली अन् मग त्याचं प्रेमात रुपांतर झालं. वरुणने २०१४ साली ‘मुकंदा’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘फिदा’, ‘कांचे’, ‘लोफर’ आणि ‘F3: फन अॅण्ड फ्रस्टेशन’ यांसारख्या चित्रपटामुळे त्याला लोकप्रियता मिळाली. लावण्याने तामिळ, तेलुगूमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती ‘डूसुकेल्था’, ‘ब्रम्मन’ आणि ‘हॅप्पी बर्थडे’ यांसारख्या बऱ्याच चित्रपटात झळकली आहे.