‘सोयरीक’ हा मकंरद माने दिग्दर्शित मराठी चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘रिंगण’, ‘यंग्राड’ आणि ‘कागर’सारखे अर्थपूर्ण आणि वेगळय़ा धाटणीचे चित्रपट दिल्यानंतर दिग्दर्शक मकंरद माने यांची ‘सोयरीक’ ही कथा खेडेगावातील गावकऱ्यांनी नापसंत केलेल्या एका प्रेमविवाहावर आधारित आहे. या प्रेमविवाहामुळे गावात सुरू झालेले रुसवे फुगवे, मत मतांतरे यावर चित्रपटाची कथा बेतलेली आहे. नव्या-जुन्या ५० कलाकारांची मोट घेऊन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने यांनी ‘सोयरीक’ हा वास्तवदर्शी कथेवरचा चित्रपट प्रेक्षकांसमोर साकारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैयक्तिक नातेसंबंध आणि समाजातील असलेलं आपलं अस्तित्व हे एकमेकांशी बांधलेलं असतं. हे गावखेडय़ात सहजी जाणवतं, शहरात पटकन लक्षात येत नसलं तरी वैयक्तिक नातेसंबंधांचा काहीएक परिणाम हा समाजावर होत असतो. किंवा उलट समाजाच्या विचारसरणीचा परिणाम व्यक्ती आणि त्याच्या कौटुंबिक आयुष्यावरही होत असतो. लग्न हा यातला एक महत्त्वाचा धागा. एक मुलगी लग्न होऊन दुसऱ्या गावात येते किंवा एखादा युवक लग्नामुळे दुसऱ्या गावचा जावई होतो, या सहजी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी. लग्न जुळण्याच्या निमित्ताने दोन घरांमध्ये, गावांमध्ये निर्माण होते ती सोयरीक.  परंतु या सोयरिकीतून निर्माण होणारे नातेसंबंधही जेव्हा स्वार्थापोटी बिघडू लागतात तेव्हा ना मुलीची मर्जी पाहिली जाते ना मुलाची. लग्नाला विरोध ही एकच गोष्ट भावकीला ठाऊक असते. या सगळय़ात अडकलेल्या प्रेमी युगुलाची फरफट कशी होते, याचे चित्रण मकरंद माने यांनी ‘सोयरीक’मधून केले आहे.

‘‘सोयरीक म्हटलं की लग्न. मग त्याभोवती सगळय़ाच चांगल्या-वाईट नाटय़मय गोष्टी या घडत असतात. प्रेमविवाह करताना एखाद्या मुलीला आजही खेडेगावात, शहरात बंधनं असतात पण त्याची रूपरेषा वेगळी असते. मुलींनादेखील जोडीदार निवडीसाठी समान स्वातंत्र्य, दर्जा असायला हवा अशा गप्पा मारल्या जातात. वास्तवात मात्र तसं होत नाही’’, अशी माहिती चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मकरंद माने यांनी दिली. ग्रामीण भागातील मुलगी जेव्हा आपल्या मर्जीने लग्न करण्याचा निर्णय घेते तेव्हा नक्की तिला येणाऱ्या अडचणी, दबाव यावर बेतलेली ही कथा आहे. मला अभिनयातून तत्क्षणी आलेल्या जिवंत प्रतिक्रिया हेरायला फार आवडतात आणि त्यात मला पुढे सुधारणाही करायला आवडतात. हा प्रयोग मी या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. यासाठी कलाकारांनाही मी संहिता दिली नव्हती. त्यांना फक्त त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यामुळे हा एक नवा प्रयोग केला आहे, त्यातून काही विचार मांडण्याचाही ‘प्रयत्न’ केला आहे, लादण्याचा नाही, असे मकरंद यांनी स्पष्ट केले.

‘लागिरं झालं जी’ या यशस्वी मालिकेनंतर अभिनेता नितीश चव्हाण याचा हा पहिलाच चित्रपट असल्याने भीती आणि आनंद या दोन्ही भावना मनात होत्या असं त्याने सांगितलं. अभिनेत्री मानसी भवाळकर आणि अभिनेता नितीश चव्हाण यांची जोडी या चित्रपटातून पाहायला मिळते आहे.

मकरंद माने यांच्यासह शशांक शेंडे आणि विजय शिंदे यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. त्याबद्दल बोलताना अभिनेते-निर्माते शंशाक शेंडे म्हणाले, ‘‘आपल्याला भावलेले चित्रपट करायला काय हरकत आहे?, या विचाराने ‘सोयरीक’ उभा राहिला. कलात्मकतेसोबतच या चित्रपटाच्या विपणनाची जबाबदारी म्हणून निर्माते विजय शिंदे हे आमच्याशी जोडले गेले.’’ या चित्रपटात शशांक शेंडे यांनी गावातील पोलीस निरीक्षकाची भूमिका केली आहे. आपल्या भूमिकेविषयी ते म्हणतात, ‘‘आजतागायत मी केलेल्या भूमिकांपेक्षा ही खरंच खूप वेगळी भूमिका आहे असं मी म्हणेन. मी पहिल्यांदाच पोलीस निरीक्षकाची भूमिका केली आहे. त्यामुळे मला कधी नव्हे ते इस्त्रीचे कपडे घालायला मिळणार, पायात बूट आणि कंबरेला पिस्तूल लावायला मिळणार, याच गोष्टीचा मला जास्त आनंद वाटला होता.  कारण धोतर, मळकट शर्ट, फाटलेला पायजमा, पिंजारलेले केस असं काही घालून मला यावेळी अभिनय करायचा नव्हता. मी नेहमी संहिता वाचून पुढचे काम करायला घेतो. निदान २० वेळा तरी मी ती वाचतोच, पण ‘सोयरीक’च्या चित्रीकरणासाठी मकरंदने आम्हाला संहिताच दिली नव्हती. त्याने हा नवा प्रयोग व्यवस्थित सांभाळून घेतला’’, असं त्यांनी सांगितलं. ‘‘मकरंदने आम्हाला सांगितलं होतं, ते १५ दिवस त्याला आम्ही सर्व कलाकार सेटवर हवे आहोत. अकलूजला श्रिपूर नावाचे गाव आहे तिथे आम्ही चित्रीकरण करत होतो. संहितेच्या हिशोबाने रचलेले ठोकताळे काही आम्ही वापरले नाहीत. त्याशिवाय त्यातून आम्ही सर्वानी खूप सुधारणा केली’’, असे ते पुढे म्हणाले.  तर ‘सैराट’मुळे घराघरांत परिचयाच्या झालेल्या अभिनेत्री छाया कदम यांनीही या चित्रपटात महिला कॉन्स्टेबलची भूमिका केली आहे. त्याबद्दल बोलताना हे पात्र साकारण्याची इच्छा खूप पूर्वीपासून होती, असं त्यांनी सांगितलं. ‘‘या व्यक्तिरेखेत अनेक छटा आहेत त्यामुळे भूमिका करत असताना त्याचे विविध पैलूही शोधता आले, दोन वर्षांंनंतर आपले काम इतक्या लोकांसमोर पोहोचते आहे यापेक्षा अधिक कोणताच आनंद नाही. त्याचसोबत आमच्या हातात कोणतीच संहिता नव्हती. त्यामुळे आम्हाला चित्रपटाचा शेवट काय आहे हेच माहिती नव्हतं तेव्हा तो शेवटही आम्ही एकत्र पाहणार, त्याचीही एक वेगळी आतुरता होती. या चित्रपटाच्या निमित्ताने मला कार्यशाळाही करता आली, कारण मी काम बघून बघून शिकत आले आहे. त्यामुळे एकंदरीतच खूप वेगळा अनुभव घेता आला’’, असं छाया कदम यांनी सांगितलं.  

‘‘आजही हिंदूी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांची आर्थिक गळचेपी होते. त्यातून आता जर दाक्षिणात्य चित्रपटही असे भाषांतरित होऊन येत राहिले तर मोठीच अडचण निर्माण होईल. आज चांगली बाब ही आहे की मराठीत हिंदूीप्रमाणे सलमान, शाहरूख आणि आमीरला डोळय़ांसमोर ठेवून कथा लिहिल्या जात नाहीत तर कथेसाठी योग्य अभिनेत्याची निवड केली जाते’’.  – शशांक शेंडे, अभिनेते

‘‘मराठी प्रेक्षकांना आता जागतिक आशय चांगलाच कळलेला आहे. ‘सोयरीक’च्या निमित्ताने समाज हा घटक कसा आहे याचा जवळून अभ्यास करावा लागला. या कथेचे सार हेच आहे की आपण खूपदा प्रगतिशील विचार बोलताना मांडतो, परंतु समाजात घडणारी कुठलीही घटना आपल्यासोबत घडली की मात्र आपण आक्रमक होतो’’ -मकरंद माने, दिग्दर्शक

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soyrik marathi film directed by makarand mane national award winning director akp
Show comments