‘अ वेनस्डे’ चित्रपटातील नासिरुद्दिन शाहने साकारलेला सामान्य माणूस आठवतोय.. त्या सामान्य माणसाच्या असामान्य करामतीचा साक्षीदार असलेला एक निवृत्त पोलिस अधिकारी (अनुपम खेर) ही कथा सांगताना म्हणतो, ‘ही घडलेली घटना कुठेही रेकॉर्डवर नाही. ती फक्त माझ्या मनात नोंदलेली आहे’. अशीच एक पोलिसांच्या हातातून निसटलेली घटना ‘वेनस्डे’चा दिग्दर्शक नीरज पांडेच्या हातात गवसली. आणि आता ‘स्पेशल २६’ या नावाने ही कथा पडद्यावर पहायला मिळणार आहे.  
१९८७ साली मुंबईच्या ऑपेरा हाऊस येथील ‘त्रिभुवनदास भीमजी झवेरी ज्वेलर्स’च्या दुकानात एक तोतया सीबीआय अधिकारी शिरला होता. त्याने आणि त्याच्याबरोबर आलेल्या २६ तोतया अधिकाऱ्यांनी धाड टाकण्याचा बहाणा करत दिवसाढवळया लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले होते. या घटनेने ज्वेलर्सच्या तोंडचे पाणी पळवले होते. ‘स्पेशल २६’ हा चित्रपट याच घटनेवर बेतलेला आहे का?, या प्रश्नाला दिग्दर्शक नीरज पांडेने थेट ‘हो’ म्हणत नाही. ‘माझे चित्रपट हे नेहमीच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अशा वेगळ्या घटनांवर बेतलेले असतात. ‘स्पेशल २६’ ची कथाही माझ्यासाठी अशीच स्पेशल आहे. कारण ती अनेकांच्या नजरेतून निसटली होती. देशात घडणाऱ्या अनेक घोटाळ्यांपैकी हाही एक घोटाळा होता, ज्यावर माझा चित्रपट बेतला आहे’, असे सांगत नीरजने या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले असले तरी ‘स्पेशल २६’चा कथाविषय हाच आहे, याबद्दल शंका नाही.
‘अक्षय कुमार या तोतया अधिकाऱ्याच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी कथेची निवड झाल्यानंतर अक्षयच मला या भूमिकेसाठी हवा होता. त्याला ही कथा आवडली होती आणि त्याने लगेच होकारही दिला. पण, प्रश्न होता तो त्याच्या तारखांचा. त्यानंतर अभिषेक बच्चन, अजय देवगण यांचाही विचार मी केला. पण, अक्षयसाठीच आम्ही थांबलो होतो. त्याच्या तारखा मिळाल्यानंतर चित्रिकरणाला सुरूवात केली’, असे नीरजने सांगितले.
१९७९ मध्ये ताजमहाल, लाल किल्ला विकतो असे सांगून अनेकांना चुना लावणाऱ्या मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ ‘नटवरलाल’चा प्रभावही अक्षयच्या व्यक्तिेरेखेवर असल्याचे बोलले जात आहे. नीरजने मात्र याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला.‘ चित्रपटाची कथा वेगळी असल्याने आम्हाला त्याबद्दलची कुठलीच माहिती उघड करायची नव्हती. याच्या प्रसिध्दीसाठी आम्ही काही वेगळे कॅम्पेन्स केले होते. या चित्रपटाचे पहिले पोस्टर आम्ही नुकतेच प्रदर्शित केले आहे. तेही वर्तमानपत्रातील बातमीच्या स्वरूपात. म्हणूनच मला या चित्रपटाच्या नेमक्या क थेविषयी काही सांगायचे नाही’, असे त्याने स्पष्ट केले. एरव्ही अक्षयला अ‍ॅक्शनपॅड भूमिकेत पाहण्याची सवय असलेला प्रेक्षक त्याला असा चापूनचोपून भांग पाडलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या वेशात पसंत क रेल?, असे विचारल्यावर ‘अक्षयची ही प्रतिमा या चित्रपटाचा आम्ही प्रेक्षकांना दाखवलेला एक भाग आहे. मुळात ही एका धूर्त माणसाची कथा आहे आणि अक्षयच या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल, असा विश्वास मला होता म्हणून तर अक्षयसाठी आम्ही थांबलो होतो’, असे नीरजने सांगितले.

Story img Loader