Singer Asha Bhosle Birthday: आपल्या हटके स्टाईलने गाणं म्हणणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या हृदयावर आजही राज्य करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. लता मंगेशकर यांचं गाणं आपल्याला जितकं भावतं, आपलंसं करतं तितकंच आशा भोसलेंचं गाणंही. लतादीदी यांना जर सरस्वतीचं रुप मानलं तर आशाताई या स्वरांची गंगा आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. आज याच आशा भोसले यांचा ९० वा वाढदिवस आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणं म्हणण्यास सुरुवात केलेल्या आशाताईंचं आयुष्य हे संघर्षमयी आणि वादळी राहिलं आहे. पण नावाप्रमाणेच त्यांनी कुठल्याही प्रसंगात आशा सोडली नाही. कुठल्याही प्रसंगात त्या डगमगून गेल्या नाहीत. त्यामुळेच त्या आशा भोसले आहेत आणि त्यांचा चिरतरूण आवाज आपल्याला आपलसं करतो, आपल्या काळजाचा ठाव घेतो.

मी ९० वर्षांची झाली आहे तरीही मनाने तरुण आहे

आशा भोसले म्हणतात मी ९० वर्षांची झाली आहे. १९४५ पासून मुंबईत गाणं म्हणते आहे. जुन्या घटना, जुने लोक, जुने संगीतकार यांच्याविषयी जेव्हा मी विचार करते तेव्हा मला वाटतं की मी आजही कुणीही नाही. मी ९० वर्षांची झाली आहे असं लोकांना वाटतं. मात्र मला वाटत नाही की मी इतकी मोठी झाली आहे. मला वाटतंय की आजपर्यंत मी जे काही काम केलंय ते काहीसं अजबच म्हणावं लागेल. पण याबाबत मी इतकंच म्हणेन की देव आपल्याकडून हे सगळं काही करुन घेतो. वय वाढलं तरीही मी मनाने तरूण आहे. ९० व्या वर्षीही उभी आहे, गाते आहे.

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
B Praak
“…त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Video of little girl singing Yeh Raaten Yeh Mausam
“हा गोंडस आवाज तिचा नाही”? ‘ये रातें, ये मोसम’ गाणे गाणाऱ्या चिमुकलीचा Viral Video पाहून नेटकऱ्यांचा दावा, काय आहे सत्य?
pravin tarde birthday his wife snehal tarde
“भाईचा बर्थडे गाणं…”, प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहलची मिश्किल पोस्ट, म्हणाली…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

मी आरशात बघायचे आणि स्वतःला सांगायचे तुला गायचं आहे..

२०१८ मध्ये एका जाहीर मुलाखतीत आशा भोसलेंना हा प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही दिसायला आजही सुंदर आहात आणि तरुण असतानाही सुंदर होतात. मग तुम्ही सिनेमांमध्ये अभिनय का करत राहिला नाहीत? त्यावर आशा भोसलेंनी खूप छान उत्तर दिलं होतं त्या म्हणाल्या होत्या, “मी रोज उठून आरशात बघायचे आणि स्वतःला सांगायचे की तुला गायचं आहे. आज तुम्हीच मला सांगा कुठली अभिनेत्री या वयापर्यंत टिकते?” आशा भोसले यांचा हाच आशादायी आणि कधीही हिंमत न हरण्याचा स्वभाव हे बहुदा त्यांच्या चिरतारूण्याचं रहस्य असलं पाहिजे.

संगीत माझ्यासाठी श्वास घेण्यासारखं

संगीत हे माझ्यासाठी श्वास घेण्यासारखं आहे. मी प्रत्येक वेळी गाणं म्हणते त्यावेळी मला हेच वाटतं. आजवर मीनाकुमारी पासून ते काजोल पर्यंत अनेक अभिनेत्रींना आवाज दिला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक ‘मूड’ची गाणी मी गायली आहेत. श्वास नसेल तर माणूस मरतो, माझ्यासाठी संगीत हाच माझा श्वास आहे. मी हाच एक विचार घेऊन आयुष्य जगले आहे. माझ्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले अनेकदा मला वाटलं की मी आता डगमगून जाईन पण मी पाय रोवून उभी राहिले आणि प्रसंगांना सामोरी गेले. आज मागे वळून पाहताना सगळं काही मजेशीर वाटतं असंही त्या हसत सांगतात.

आशा भोसले, फोटो सौजन्य, फेसबुक पेज
आशा भोसले, फोटो सौजन्य फेसबुक पेज

आशा भोसले यांचा जन्म सांगलीचा

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ ला महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये झाला. पंडित दिनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर हे त्यांचे आई वडील. तर लता मंगेशकर या त्यांची मोठी बहीण. उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि मीना खडीकर या भावंडांमध्ये आशाताई मोठ्या आहेत. दहाव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केलेल्या आशाबाईंनी आजवर १२ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी आणि हिंदी गाण्यांचा एक काळ असा होता ज्या काळावर त्यांनी शब्दशः राज्य केलं आहे. आशा भोसले ९ वर्षांच्या होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचं सगळं कुटुंब मुंबईत आलं. आशा भोसलेंनी मग लतादीदींसह कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटांमध्ये गाणी म्हणण्यास आणि अभिनय करण्यास सुरुवात केली.

‘माझा बाळ’ नावाच्या सिनेमात आशा भोसले पहिलं गाणं गायल्या होत्या. त्यानंतर आजवर शेकडो हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी त्यांनी गाणी म्हटली आहेत. लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका जेव्हा संगीत क्षेत्रावर राज्य करत होत्या त्या सगळ्यांमध्ये आशा भोसलेंनी आपली एक शैली निर्माण केली आणि या स्पर्धेत त्या प्रस्थापित गायिकांपेक्षा वेगळ्या आणि अष्टपैलू ठरल्या. भावगीत, शास्त्रीय संगीत यापासून ते अगदी उडत्या चालीचीही अनेक गाणी आशा भोसलेंनी लीलया गायली.

वयाच्या १६ व्या वर्षी ३१ वर्षांच्या गणपतराव भोसलेंशी लग्न

वयाच्या १६ व्या वर्षी आशाताईंनी गणपतराव भोसलेंशी लग्न केलं. मंगेशकर कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. आशा मंगेशकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताई लग्नानंतर आशा भोसले म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या त्या आजपर्यंत हेच आडनाव लावतात. गणपतराव भोसले यांच्याशी लग्न झाल्यानंतर आशाताई आणि लता मंगेशकर यांच्यात दुरावा निर्माण झाला. कारण लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबाला आशाताईंचा हा निर्णय मुळीच आवडला नव्हता. दोघींमध्ये दीर्घकाळ बोलणंही बंद होतं असंही सांगितलं जातं. मात्र याबाबत लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की आम्ही आशाशी बोलणं बंद केलं नव्हतं. भोसलेंनी आमच्याशी बोलायचं नाही अशी ताकिद आशाला दिली होती.

गणपतराव भोसलेंशी लग्न झाल्यानंतर पहिली काही वर्षे बरी गेली. पण त्यानंतर दोघांमध्ये भांडणं आणि वाद होऊ लागले. गणपतराव भोसलेंना हे आवडत नव्हतं की आशाताईंनी लता मंगेशकर किंवा मंगेशकर कुटुंबाशी काही संबंध ठेवावेत. त्यावरुनही त्यांच्यात खटके उडायचे. गणपतरावांपासून आशाताईंना तीन मुलं झाली. आशाताई १९६० च्या सुमारास पती गणपतराव भोसले यांच्यापासून विभक्त झाल्या. १९६६ मध्ये गणपतराव भोसले यांचं निधन झालं. आशा भोसले यांनी तीन मुलांच्या आपल्या हिंमतीवर सांभाळ केला.

आशाताईंच्या दोन मुलांचा मृत्यू

आशा भोसले यांना तीन मुलं होती. हेमंत भोसले, आनंद भोसले आणि मुलगी वर्षा भोसले. यापैकी दोघांचं निधन झालं आहे. २०१५ मध्ये हेमंत भोसले हे कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने वारले. तर २०२१ मध्ये वर्षा भोसलेंनी आत्महत्या केली. आता त्यांचा मुलगा आनंद भोसले हा दुबईमध्ये रेस्तराँची चेन चालवतो.

आशा भोसलेंनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की लग्नानंतर त्या बोरीवलीला राहण्यासाठी गेल्या. बोरीवली हे उपनगर तेव्हा एखाद्या खेड्यासारखं होतं. त्या गाणं गात होत्या, गाणं गाण्याआधी त्यांना घरातली कामंही करावी लागत होती. विहिरीवर जाऊन पाणी भरणं, मुलांसाठी आणि सासूबाईंसाठी जेवण तयार करणं, मुलांना शाळेत सोडून येणं आणि मग आपल्या कामासाठी जाणं. सगळी कामं केल्यानंतर कधी कधी आठ तास उभं राहूनही मी गाणं म्हटलं आहे असंही आशाताईंनी सांगितलं होतं.

आर.डी. बर्मन आयुष्यात आले आणि…

आर.डी. बर्मन म्हणजेच राहुल देव बर्मन हे आशाताईंच्या आयुष्यात आले ते तिसरी मंजिल या सिनेमाच्या वेळी. १९६६ मध्ये हा सिनेमा आला होता. या चित्रपटाने आशाताईंना वेगळी ओळख मिळवून दिली. आर.डी. बर्मन यांच्यासह आशाताईंनी कॅब्रे, रॉक, डिस्को, गझल, शास्त्रीय संगीत अशा धाटणीची गाणी गायली आहेत. या दोघांचे सूर जुळले. त्यानंतर १९८० मध्ये या दोघांनी लग्न केलं. आशा भोसले या पंचमदा म्हणजेच आर. डी. बर्मन यांच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लग्नाला बर्मन यांच्या घरातून विरोधही झाला होता. या दोघांचे सूर तर जुळलेच.. पण दोघांनाही आणखी एक छान सवय होती ती म्हणजे स्वयंपाक करण्याची. या आवडीमुळेही हे दोघं एकत्र आले. आर.डी. बर्मन यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत आशाताई त्यांच्या बरोबर होत्या.

आशा भोसले आणि आर. डी. बर्मन
आशा भोसले – आरडी बर्मन

ओ. पी. नय्यर यांचाही आशाताईंच्या यशात मोठा वाटा

संगीतकार ओ. पी. नय्यर यांचाही आशा भोसलेंच्या आवाजाला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. सीआयडी या सिनेमासाठी ओ. पी. नय्यर यांनी आशा भोसलेंना गायनाची संधी दिली. तसंच १९५७ मध्ये आलेल्या नया दौर या सिनेमातही आशा भोसले यांनी गाणं गायलं होतं. मांग के साथ तुम्हारा, उडे जब जब जुल्फे तेरी ही गाणी हिट झाली. त्यानंतर १९५८ मध्ये आलेल्या हावडा ब्रिज या सिनेमातलं आईयें.. मेहरबा हे मधुबालावर चित्रित झालेलं गाणंही लोकांच्या मनात आजही रुंजी घालतंय.

आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यातल्या स्पर्धेच्या चर्चा

आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघींनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली, तो काळ बऱ्यापैकी सारखा होता. त्यामुळे या दोघींमध्येही स्पर्धा आहे असं बोललं जायचं. अगदी लतादीदी हयात असेपर्यंत या चर्चा रंगायच्या. याबाबत आशा भोसलेंनी २०१८ मध्ये सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. दीदी एक टोक घेऊन गात राहिली. तिची गाणी तिच्या शैलीला साजेशी संस्कारी, निर्मळ, शांत असायची. दुसरं टोक घेऊन मी गात राहिले, माझी गाणी ही माझ्यासारखी अवखळ असायची. त्यामुळे मी कुठलं गाणं गायचं आहे हे काही बंधन ठेवलं नाही. आम्ही दोघींनी एक काळ राज्य केलं आहे, मात्र काळानुरुप आपल्याला बदलावं लागतं हे देखील खरं आहे असंही आशा भोसले या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

लतादीदीबरोबर स्पर्धा कधीच नव्हती

९० च्या दशकात मुलाखतकार सलील चौधरी यांनी आशा भोसले यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत लतादीदींसह जो तुमचा सांगितिक प्रवास झाला तेव्हा लता मंगेशकरांपासून तुम्ही स्वतःला वेगळी शैली कशी काय निर्माण केलीत? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आशा भोसले म्हणाल्या होत्या, “लतादीदी माझी मोठी बहीण होती. त्यातून दीदी सुंदर गायची त्यामुळे मी सुरुवातीला तिची नक्कल करायचे. दीदी जसं गायची तसंच मी गायची. मोठ्या बहिणीची नक्कल करणं हा त्यामागचा स्थायीभाव होता. कुठलंही गाणं दीदीने म्हटली की मी तसंच गाणं त्यावेळी म्हणायची. पण मला हे लक्षात आलं होतं लता मंगेशकर हे नाव इतकं मोठं झालं होतं की तिच्यासारखं गाणं म्हणणाऱ्याला कोण चान्स देणार? लोक म्हणायचे ही (आशाताई) बहिणीसारखं म्हणजेच लतासारखं गाते. लतासारखं गाते असं जेव्हा लोक म्हणायचे ते मला आवडायचं नाही.

कुठल्या गायक-गायिकांचा आशाताईंवर प्रभाव?

मी स्वतः काय आहे हा विचार करु लागले. मग मी दीदीपेक्षा स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. मी लहान होते तेव्हा कॅरमन मरांडांची गाणी बऱ्याचदा ऐकली होती. कॅरमन मरांडा वेगळं गायची, ते शास्त्रीय गायनापेक्षा वेगळं होतं. मग मी ठरवलं की अशाच पद्धतीने गायचं. मिस्टर जॉन हे गाणं जेव्हा मी गायले तेव्हा मी तशी एक लकेर घेतली. त्यावेळी सी. रामचंद्रन आले आणि म्हणाले आशा काय सुंदर लकेर घेतलीस अशीच घेत जा. हळूहळू मी स्वतःची शैली निर्माण केली. त्यासाठी मी विदेशातल्या अनेक गायिकांची गाणी ऐकली. एल्विस प्रेस्ली गायचा, त्याला मी कॅच केलं. आज कल ये छोकरे मी त्याच्या स्टाईलने गायले आहे. कॅथरिन बॅलेंटनाचं गाणं ऐकलं, ती जसं गाते तसं गाण्याचाही प्रयत्न केला. त्या स्टाईलमध्ये मी आलाप घेतले. त्यामुळे माझ्या आवाजावर ते संस्कार होत गेले आणि माझा आवाज दीदीसारखा न वाटता वेगळा वाटू लागला आणि लोकांना तो आवडला.”

आशा भोसले, संग्रहित छायाचित्र

साज सिनेमा लता मंगेशकर आणि आशाताईंच्या आयुष्यावर बेतलेला?

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अनेकदा ही बाब सांगितली आहे की आमच्यात स्पर्धा नव्हती. मात्र त्यांच्यातल्या स्पर्धेचा मुद्दा तेव्हाही उपस्थित झाला होता जेव्हा ‘साज’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अरूणा ईराणी, शबाना आझमी आणि उस्ताद झाकीर हुसेन यांच्या भूमिका होत्या. गायिका असलेल्या दोन बहिणींवर या सिनेमाचं कथानक होतं. मोठी बहीण ही सुरुवातीला लहान बहिणीला कोरसमध्ये उभी करते आणि त्यानंतर मगा लहान बहीण आपलं वेगळं स्थान मिळवते तेव्हा या दोघींमध्ये कसा संघर्ष होतो? यावर ही कथा बेतलेली होती. मात्र स्वतः सई परांजपे यांनी हा सिनेमा लता मंगेशकर आणि आशा भोसलेंच्या आयुष्यावर नव्हता असं म्हटलं आहे. सई परांजपेंच्या सय नावाच्या पुस्तकात त्यांनी याविषयी लिहिलं आहे. त्या म्हणतात की लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोघी सख्ख्या बहिणी जेव्हा गायिका म्हणून पार्श्वसंगीताच्या दुनियेत समोरासमोर आल्या तेव्हा त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असेल? हे माझ्या मनात होतं. त्यातून मी बन्सी आणि मानसीची कथा लिहिली आणि चित्रपट केला. या सिनेमाचा लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांच्याशी काहीही संबंध नव्हता.

आशाताईंची गाजलेली गाणी

आशा भोसलेंनी आजवर हजारो गाणी गायली आहेत. त्यांचा खास आवाज आणि शैली ही आपल्याला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहात नाही. ‘जीवलगा कधी रे येशील तू?’, ‘तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते’, ‘हृदयी प्रीत जागते जाणतां अजाणता..’, ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’, ‘का रे दुरावा, का रे अबोला’, ‘डोळे हे जुल्मी गडे’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’, ‘तरुण आहे रात्र अजूनी’ अशी कितीतरी गाणी आपण अगदी सहज गुणगुणतो. मराठीप्रमाणेच हिंदी गाण्यांवरही आशा भोसलेंची पकड त्यांचा वेगळेपणा सांगून जाते. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दिल चीज क्या है आज मेरी जान लिजिये’ , ‘परदे में रहने दो.. परदा ना उठाओ’ ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ इथपासून रंगीलातल्या याई रे याई रे.. पर्यंत आणि मुझे रंग दे पासून ते मधुबन कन्हैय्या जो गोपीसे मिले.. या गाण्यांपर्यंत आपण येऊन ठेपतो.

आशा भोसले यांनी गायलेल्या गाण्यांची आठवण आपल्या मनाला झाली की आपण सुखावतो. त्यांचा आवाज ही खरंच दैवी देणगी आहे. मागची आठ दशकं हा आशा भोसले नावाचं गारूड आपल्या सगळ्यांच्याच मनावर अधिराज्य करतंय आणि यापुढेही त्यांचा आवाज आपल्या मनात असाच आपल्या मनात रुंजी घालत राहिल यात काही शंका नाही.