७० च्या दशकात हिंदी सिनेमा बराच पुढारलेला होता. नायक, नायिका यांचे प्रेमप्रसंग, धाड-धाड मारपट, स्ट्राँग व्हिलनशी स्ट्राँग हिरोने केलेला मुकाबला, असे चित्रपट एकीकडे ज्यामध्ये अमिताभ, धर्मेंद्र हे आपली छाप सोडत होते. तर दुसरीकडे होते राजेश खन्नाचे चित्रपट. हिंदीतला पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाचा उल्लेख कायमच केला जातो. १९७५ मध्ये बिग बी अमिताभच होता… बिग बी झाला नव्हता. त्याच्या सिनेसृष्टीतल्या करिअरचा तो प्रचंड चढता आलेख होता. अशा सगळ्या वातावरणात सिनेसृष्टीला मिळाली एक अमोल भेट. त्याचे कारण ठरले बासू चटर्जी! आणि अर्थात बी. आर. चोप्राही. अमोल पालेकरांच्या रुपाने सिनेसृष्टीने ही भेट आपल्या सगळ्यांनाच दिली. व्यावसायिक सिनेमा एकीकडे तिकिटबारीवर गल्ला जमवत होते. तर अमोल पालेकर यांनी मध्यमवर्गीय प्रेक्षकाची नाळ अचूक ओळखत त्यांना आपला वाटणारा नायक उभा केला आणि यशस्वीही करून दाखवला. हे सगळं आठवण्याचं कारण छोटसंच आहे.. छोटीसी बात या सिनेमाला आज थोडी थोडकी नाहीत तर तब्बल ४३ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी याच तारखेला १९७६ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने मुंबईतल्या तीन थिएटर्समध्ये सिल्व्हर ज्युबिलीही साजरी केली.

सिनेमाची कथा अगदी साधी आणि आपली वाटेल अशी होती. रोमँटीक कॉमेडी हा सिनेमाचा मूळ गाभा. अरूण (अमोल पालेकर) नावाचा एक तरुण त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रभाच्या (विद्या सिन्हा) प्रेमात पडतो. पण असतो बिचारा बुजरा.. त्यावेळच्या तमाम मध्यमवर्गीयांना जे प्रश्न पडायचे तेच त्याला पडतात. ऑफिसमधल्या आवडत्या मुलीशी बोलायचं कसं हेदेखील त्याला कळत नसतं. त्याकाळात काही हा माझा क्रश, हा माझा बीएफ असले प्रकार नव्हते. मुलींशी, महिलांशी बोलायलाही अनेक लोक कचरत असत. अस्वस्थ पण प्रेमळ, जीवापाड काळजी करणारा एक नायक अमोल पालेकर यांनी सशक्तपणे उभा केला. आता सिनेमात प्रेमी युगुल दाखवलं आणि त्यात कबाबमे हड्डी नसेल तर काय अर्थ आहे? सगळा सिनेमाच गुडी गुडी होऊन जाईल तसंच एक पात्र या सिनेमातही आहे. तो आहे नागेश (असरानी) तो प्रभाला इंप्रेस करतो. जी गोष्ट अरूणला करावीशी वाटत असते तिथे नागेश कसा बाजी मारून जातो हे दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी अरूणची अवस्था पाहून आपल्याला हसूही येतं आणि दयाही येते. मग अरूण प्रभासाठी तयार व्हायचं ठरवतो आणि कर्नल नागेंद्रनाथ (अशोक कुमार) यांच्याकडे ट्रेनिंग घेतो. मॅनरिझम चक्क शिकतो, मुलीला इंप्रेस कसं करायचं इथपासून ते टेनिस कसं खेळायचं, गाडी कशी चालवायची हे सारं सारं काही अरूण शिकतो. ट्रेनिंग घेऊन परत आल्यावर नागेशला ज्याप्रकारे उल्लू बनवतो ती सगळी भट्टी लाजवाब जमली आहे. हा सिनेमा पाहाताना आजही कंटाळा येत नाही याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा सिनेमा दक्षिण मुंबईत शूट करण्यात आला आहे. बेस्ट बसमधून प्रवास करणारे नायक नायिका हे छोटीसी बातमध्येच समोर आले. या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे यातली गाणी छोटीसी बात किंवा जानेमन जानेमन ही गाणी आजही तुमच्या माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांच्या तोंडी आहेत.

छोटीसी बातबाबत असाही एक किस्सा आहे की हा सिनेमा बी.आर चोप्रा यांनी अगदी सहज म्हणून बनवला होता, मात्र या सिनेमाने त्यांना भरपूर नफा मिळवून दिला. सिनेमात आपल्याला धर्मेंद्र-हेमामालिनीही एका गाण्यात भेटतात. तसंच एका प्रसंगात अमिताभही हजेरी लावून जातो. दादामुनी अर्थात अशोक कुमार यांचा सिनेमातला वावर तर लाजवाब आहे. या सिनेमाच्या पटकथेसाठी बासू चटर्जी यांना १९७७ मध्ये फिल्मफेअर अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं होतं. एक हलकाफुलका आणि सगळे ताण विसरायला लावणारा हा सिनेमा ४३ वर्षांचा झाला. चाळीशीच्या अनुभावचं गाठोडं उलगडून दाखवावं तसा हा सिनेमा आहे. सिनेमातले छोटे छोटे प्रसंग अगदी त्या-त्या जागी चपखल बसले आहेत. आजही हा सिनेमा पाहिला की आपण रिफ्रेश होतो हे हा सिनेमा चिरतरूण राहण्यामागचं कारण आहे.

बासू चटर्जी या दिग्दर्शकाने सिनेसृष्टीला दिलेलं योगदान कधीही न विसरता येण्यासारखं आहे. ‘एक रुका हुआ फैसला’, ‘कमला की मौत’, छोटीसी बात, रजनीगंधा, पिया का घर, खट्टा मीठा, चक्रव्यूह, बातो-बातोंमे, मनपसंद, हमारी बहू अलका, चमेली की शादी यासारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमा आणि विषय त्यांनी सिनेसृष्टीला दिले. एकीकडे व्यावसायिक सिनेमा येत होते आणि दुसरीकडे बासू चटर्जी, ऋषीकेश मुखर्जी यांच्यासारखे दिग्दगर्शक समांतर सिनेमात हलकेफुलके विषय हाताळून ते विषय यशस्वी करून दाखवत होते. छोटीसी बातने अमोल पालेकर यांना स्टार केलं. अमिताभसारख्या नटाचा करीश्मा सुरु असताना पालेकरांनी त्याला टक्कर देणं ही छोटी नाही तर नक्कीच बडी बात ठरली यात शंका नाही!

समीर चंद्रकांत जावळे
sameer.jawale@gmail.com

 

Story img Loader