विजय चव्हाण म्हटलं की आपल्या समोर पटकन येते ती ‘मोरूची मावशी’. स्त्री भूमिकेत विजय चव्हाण फुगडी घालायचे, पिंगा घालायचे त्यांच्या तोंडी असलेले ‘टांग-टिंगाक टांग-टिंगा.. टांग-टिंगाक टूम.. हे गाणे तर पुढच्या सगळ्या पिढ्यांना तोंडपाठ झाले होते. ‘मोरूच्या मावशी’ने म्हणजेच विजय चव्हाण यांनी आज आपल्यातून अकाली एक्झिट घेतली आहे. सहज सुंदर अभिनय आणि टायमिंगने विनोद साधण्याची हातोटी असे गुणविशेष असलेला हा हरहुन्नरी अभिनेता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.
‘मोरूची मावशी’ हे नाटक आचार्य अत्रेंनी लिहिले. इंग्रजी नाटक ‘चार्लीज आंट’चा हा स्वैर अनुवाद होता. या नाटकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन हे दोघेही होते. मात्र लक्षात राहिले ते विजय चव्हाणच. कारण त्यांच्या वाट्याला आलेली मावशीची भूमिका त्यांनी अजरामर केली. मोरू (प्रशांत दामले), भय्या (प्रदीप पटवर्धन) आणि बंड्या म्हणजे (विजय चव्हाण) अशी पात्रे या नाटकात होती. मोरूची मावशी बनून विजय चव्हाण नाटकात एंट्री घेतात आणि त्यानंतर सुरू होते एकच धमाल! ही भूमिका आता भरत जाधव करणार आहे अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. भरत जाधवने साकारलेली मावशी कशी असेल हे पाहणे महत्त्वाचे असेलच. पण विजय चव्हाण आणि मोरूची मावशी हे एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत हे नक्की. मंगेश कदम दिग्दर्शित हे नाटक नव्या संचात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. ज्या पिढीने विजय चव्हाण यांचे नाटक पाहिले नाही त्या प्रेक्षकांसाठी ही ट्रीट असेल. मात्र प्रेक्षक त्यांनी साकारलेली मावशी कायमच लक्षात ठेवतील. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘अशीही बनवा बनवी’ या सिनेमात स्त्री भूमिका साकारली होती. जशी ती भूमिका अजरामर झाली अगदी तेवढीच लोकप्रियता ‘मोरूची मावशी’ या भूमिकेलाही लाभली.
त्यानंतर केदार शिंदे यांच्या ‘तू-तू-मी-मी’ या नाटकातही विजय चव्हाण यांनी १४ भूमिका साकारल्या होत्या. अक्षरशः काही सेकंदात ते वेशभूषा बदलून रंगमंचावर येत असत. हे नाटक लोकांच्या आजही स्मरणात आहे. या नाटकात ‘मिसेस. खचले’ नावाचे स्त्री पात्र विजय चव्हाण साकारायचे. ‘मोरूची मावशी’नंतर ही त्यांची स्त्री भूमिकाही त्याच पात्राशी साधर्म्य सांगणारी होती. ‘मी खचले..’ असं म्हणत ते एंट्री घ्यायचे. प्रेक्षक अचंबित व्हायचे मग ते म्हणायचे ‘अहो असे पाहाताय काय? मी मिसेस खचले..’ आणि मग एकच हशा पिकायचा.
छबिलदास एकांकिका स्पर्धेतून विजय चव्हाण पुढे आले. रंगभूमीवर त्यांचा वावर अत्यंत सहज सुंदर असायचा. विनोदी भूमिका ते जितक्या सहजपणे साकारायचे तेवढ्याच सहज ते खलनायक किंवा गंभीर भूमिकाही साकारायचे. मात्र ते प्रसिद्ध होते ते विनोदी भूमिकांसाठीच. अविष्कार या नाट्यसंस्थेचे अरविंद देशपांडे, जयदेव हट्टंगडी, विजया मेहता, सुलभाताई देशपांडे यांच्याकडून त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. ‘मोरूच्या मावशी’मुळे आयुष्याला कलाटणी मिळाल्याचे स्वतः विजय चव्हाण यांनी एका मुलाखतीत सांगितले.
‘श्रीमंत दामोदर पंत’ या नाटकात ते ‘अण्णा’ अर्थात ‘गणपत’ची भूमिका साकारत. या नाटकाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. भरत जाधव आणि विजय चव्हाण यांच्या अभिनयाची जुगलबंदीच या नाटकात बघायला मिळत होती. या नाटकात भरत जाधवचा ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ या गाण्यावरचा नाच आणि त्यानंतर विजय चव्हाण म्हणत असलेले डायलॉग्ज चांगलेच गाजले. ‘कार्टी प्रेमात पडली’, ‘लहानपण देगा देवा’, ‘कशात काय लफड्यात पाय’, ‘देखणी बायको दुसऱ्याची’, ‘बाबांची गर्लफ्रेंड’ ही त्यांची गाजलेली नाटके. ‘असे पाहुणे येती..’ या मालिकेतली त्यांची मध्यवर्ती भूमिकाही प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहे. त्याचप्रमाणे ‘रानफूल’, ‘लाइफ मेंबर’ याही मालिका गाजल्या होत्या. मनोरंजन विश्वात त्यांची कारकीर्द ४० वर्षांची होती. कधी डोळे मोठे करून, चेहऱ्यावर विचित्र भाव आणून त्यांचे हसवणे, किंवा कधी एका डोळ्याची पापणी मिटून विशिष्टपणे हेल काढून बोलणे हे देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ८०-९० चे दशक गाजवणारा हा कलाकार आता आपल्यातून कायमचा निघून गेला आहे.
अभिनेता विजय कदम आणि विजय चव्हाण या तिघांनी मिळून रंगतरंग नावाची एक नाट्यसंस्थाही सुरू केली होती. त्यानंतर विजय चव्हाण यांची ओळख झाली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी. पुरुषोत्तम बेर्डे तेव्हा टूरटूर नाटक करत होते. या नाटकात विजय चव्हाण यांना भूमिका मिळाली ती लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळेच.
मोरूची मावशी या नाटकामुळे विजय चव्हाण यांना अनेक चित्रपटही मिळाले. एक काळ असा होता की विजय चव्हाण नाहीत असा एकही मराठी सिनेमा नसे. मात्र सिनेमाही आपल्याला सहजासहजी मिळाला नाही. त्यासाठी खूप स्ट्रगल करावे लागले असे विजय चव्हाण यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते. झपाटलेला सिनेमातला हवालदार, जत्रा सिनेमातला कानोळे, पछाडलेलामधला मालक.. मालक असा धोशा लावत बेरकी काम करणारा किरकिरे या त्यांच्या भूमिका कायमच स्मरणात राहतील. सहज सुंदर अभिनयाची देणगी लाभलेला हा अभिनेता अकाली एक्झिट घेऊन कायमचा निघून गेला आहे. नाटकांमधील निखळ विनोदाचे एक पर्व संपल्याची भावनाच आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र सरकारच्या व्ही. शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ते व्हील चेअरवरून रंगमंचावर आले. त्यांची रंगमंचावरची ती एंट्री चटका लावणारी होती आणि त्यांची ही अकाली एक्झिटही चटका लावणारीच ठरली आहे.