दिलीप ठाकूर
डॉ. श्रीराम लागू हे केवळ अष्टपैलू अभिनेते नव्हते तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक प्रकारच्या सामाजिक गोष्टींबद्दल विशेष जागरुक असणारे आणि तेवढंच आपल्या मनाला आणि मताला पटेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करणारे असे कलाकार होते. लागू यांनी फक्त मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट यामध्ये एकप्रकारे वाहून घेणं, तिथेच सतत बिझी राहणं असं आयुष्य स्वीकारण्यापेक्षा त्यांनी आपली अभिनय कारकीर्द आणि आपली सामाजिक बांधिलकी यांचा समतोल चांगला राखला.
डॉ. लागू यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवातच व्ही. शांताराम यांच्या पिंजरा (१९७२) या चित्रपटातून करताना आपल्या अभिनयाची खोली, उंची आणि ताकद दाखवली. अभिनयाची एक स्वतंत्र शैली असल्याने त्यांचा पहिल्याच सिनेमापासून प्रभाव पडला. ‘पिंजरा’मधील त्यांचा ‘मास्तर’ हा एका लावणी नर्तिकेच्या सौंदर्याच्या मोहात कशाप्रकारे अडकतो आणि आपल्या तत्त्वांची आणि आयुष्याची कशी विल्हेवाट लावून घेतो हे त्यांनी अगदी समर्थपणे साकारले. चित्रपती व्ही. शांताराम हे कायमच आपल्या चित्रपटातील व्यक्तिरेखांनुसार कलाकारांची निवड करण्यात चौकस असत. अशात डॉ. लागू यांची निवड त्यांनी केली यातच डॉ. लागू यांच्या अभिनयाची ताकद दिसून येते.
एकीकडे वि. वा, शिरवाडकर यांचं नाट्यकलावंताची शोकांतिका दाखवणारं ‘नटसम्राट’ नाटक आणि त्याचवेळी मराठी सिनेमातले काही वेगळे प्रयोग अशी दुहेरी वाटचाल त्यांनी यशस्वीरित्या सुरु ठेवली. ‘नटसम्राट’चा अप्पा बेलवलकर साकारताना रंगभूमीशी तादात्म्य पावलेल्या एका रंगकर्मीचं स्वगत साकारणं हे एकप्रकारे मानसिक, बौद्धिक आणि शारिरीक थकवा देणारं होतं. मात्र डॉ. लागू त्या व्यक्तिरेखेशी कमालीचे एकरुप झाले. मात्र याच व्यक्तिरेखेने त्यांना एका टप्प्यावर थांबण्यास भाग पाडलं. त्यामुळे नटसम्राट या नाटकाचे प्रयोग त्यांनी थांबवले. मात्र रंगभूमीवरचा त्यांचा प्रवास सुरुच राहिला. ‘हिमालयाची सावली’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘गिधाडे’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘काचेचा चंद्र’, ‘आंधळ्यांची शाळा’ ही त्यांची नाटकं विशेष गाजली. तसंच अशा अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.
दुसरीकडे त्यांनी डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘सामना’ (१९७५) या सिनेमात गांधीवादी विचारांचा स्वातंत्र्यसैनिका मास्तर एका कावेबाज साखरसम्राटाचं म्हणजेच हिंदूराव धोंडे पाटीलचं (निळू फुले) कसं गर्वहरण करतो हे साकारलं. या चित्रपटात डॉ. लागू आणि निळू फुले यांच्या अभिनयाचा आणि संवादफेकीचा ‘सामना’ हा मराठी चित्रपटसृष्टीतला एक माईलस्टोन ठरला. त्यानंतर जब्बार पटेल यांच्या सिंहासन या राजकीयपटामध्ये डॉ. लागू हे आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वात उठून दिसले. बाबासाहेब फत्तेलाल यांच्या ‘सुगंधी कट्टा’ या लावणीप्रधान चित्रपटात त्यांनी जयश्री गडकर यांच्यासोबत भूमिका साकारली.
ऐंशीच्या दशकात एकीकडे काही नाटकांमधून रंगभूमीवरचा प्रवास आणि त्याला समांतर मराठी, हिंदी सिनेसृष्टीचा प्रवास यामध्ये त्यांनी वैविध्य जपलं. हिंदी चित्रपटांच्या बाबतीत तर त्यांनी एकीकडे भीम सिंग यांचा ‘घरौंदा’, प्रकाश मेहरा यांचे ‘लावारिस’ आणि ‘नमकहलाल’, ब्रिज यांचा ‘मग्रुर’, सावनकुमार यांचा ‘सौतन’ अशा तद्दन व्यावसायिक हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारणं हे लागू यांनी कमीपणाचं मानलं नाही. एकीकडे त्यांनी दर्जेदार भूमिकांवर आपलं लक्ष केंद्रीत करताना व्यावसायिक चित्रपटांमधूनही भूमिका साकारण्याचाही आनंद घेतला.
त्या काळामध्ये डॉ. लागू यांचं असं म्हणणं असे की आत्ता आपण १५ ते २० वर्षांची मोठी वाटचाल करुन पुढील आयुष्य आपल्या अशा गोष्टींसाठी ठेवावं ही त्यांची भावना आणि भूमिका होती. हे सगळं करताना आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींबद्दल ते कायमच सजग असत आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असत. डॉ. लागू यांच्या काही मतांवरून वादही निर्माण झाले. मात्र त्यांनी आपलं म्हणणं हे आपल्या तर्काला धरुन, बुद्धीप्रामाण्यावादी आहे हे त्यांनी कायमच ठामपणे मांडले. भरपूर वाचन हेदेखील डॉ. लागू यांच्या व्यक्तिमत्त्वाचं विशेष आहे. अशा या प्रवासात त्यांनी १९८० मध्ये ‘झाकोळ’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शनही केलं. या चित्रपटात तनुजा आणि सरला येवलेकर तर लहानपणीची उर्मिला मातोंडकर यांच्या भूमिका होत्या. अगदी क्रिकेटर सुनील गावस्कर यांनाही त्यांनी आपल्या चित्रपटात छोट्याश्या भूमिकेत चमकवले. अभिनयाची एक विशिष्ट ढब, बोलके डोळे आणि प्रभावी हावभाव या गुणांमुळे डॉ. लागू यांचा प्रभाव कायमच पडला.
कालांतराने आपल्या आवडत्या पुणे शहरातच ते स्थायिक झाले, पुण्यात राहात असताना त्यांनी पुण्यातील काही सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडींमध्येही सहभाग घेतला.