मुंबई : १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाअंतर्गत नाट्य परिषदेतर्फे प्रथमच २० फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बंगाली, तमिळ, इंग्रजी, हिंदी, मराठी अशा विविध भारतीय भाषांमधील वैविध्यपूर्ण नाटकांची पर्वणी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. तसेच, प्रायोगिक व व्यावसायिक नाटकांवर आधारित परिसंवादही यावेळी होणार आहेत. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर व साळगांवकर प्रायोगिक रंगमंच आणि भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा विशेष नाट्यमहोत्सव होणार आहे.
मुंबईतील विशेष नाट्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदी मंडळी उपस्थित होती. यावेळी प्रशांत दामले म्हणाले की, ‘मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन नाट्यकलेतील विविध पैलूंचे दर्शन प्रेक्षकांना घडण्यासाठी भारतीय भाषांमधील नाट्यमहोत्सव आयोजित करीत आहोत. यामुळे नवोदित कलाकारांना खूप काही शिकायला मिळेल’.
हा नाट्य महोत्सव संपूर्णत: नि:शुल्क असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेशिका आदल्या दिवशी कार्यक्रमस्थळी दिल्या जातील. विविध भारतीय भाषांतील नाटकांचे कथानक व नाटकाची थोडक्यात माहिती असणारे पत्रकही प्रेक्षकांना देण्यात येणार आहे. सध्या १०० व्या नाट्य संमेलनाअंतर्गत विविध कार्यक्रम सुरू असल्यामुळे या नाट्य संमेलनाची सांगता येत्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर किंवा रत्नागिरी येथे होईल, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
‘विशेष नाट्य महोत्सवामुळे मुंबईतील कलाकारांना आणि नाट्य रसिकांना वेगवेगळ्या राज्यातील व प्रांतातील नाटक अनुभवता येणार आहे’, असे नाटय परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी सांगितले.
२० ते २६ फेब्रुवारी विविध प्रयोग
यशवंत नाट्य मंदिर येथे २० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील अनीक थिएटरचे बंगाली भाषेतील ‘अक्षरिक’, २१ फेब्रुवारी रोजी मुंबईतील थिएटर अपर्णाचे हिंदी भाषेतील ‘बॅरीकेड’, २२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील राखाडी स्टुडिओचे मराठी भाषेतील ‘ठकीशी संवाद’, २३ फेब्रुवारी रोजी पाँडिचेरी येथील वेलीपडई थिएटर मूव्हमेंटचे तमिळ भाषेतील ‘नादापावाडई’ आणि मुंबईतील प्ले हाऊस प्रॉडक्शन्सचे इंग्रजी, तमिळ व हिंदी भाषेतील ‘गरम रोटी’ हे नाटक सादर होईल. तसेच २४ फेब्रुवारी रोजी प्रायोगिक नाटकावर आधारित परिसंवाद, २६ फेब्रुवारी रोजी अच्युत वझे लिखित ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ या नाटकाचे पुस्तक प्रकाशन आणि व्यावसायिक नाटकावर आधारित परिसंवाद होणार आहे.
‘निर्मात्यांनी खबरदारी घेणे आवश्यक’
वैयक्तिक कार्यक्रमासाठी वाहनतळाची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे एका व्यक्तीने चक्क बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेले मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्य मंदिरच आरक्षित केल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच समोर आला होता. या पार्श्वभूमीवर प्रशांत दामले म्हणाले की, ‘कालिदास नाट्यमंदिरात घडलेला प्रकार हा धक्कादायक होता. मोजक्याच प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाट्यप्रयोग झाल्यामुळे निर्मात्यांसह कलाकारांनाही त्रास झाला. या स्वरूपातील प्रकरणे ही निर्मात्यांकडूनच अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे येत असतात आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जातो. त्यामुळे नाट्य परिषदेने खबरदारी घेण्याऐवजी एखादी संस्था नाटकाचा प्रयोग लावण्याची मागणी करते, तेव्हा सर्वप्रथम निर्मात्यांनीच सर्व गोष्टींची चौकशी केली पाहिजे आणि हेतू तपासून खबरदारी घेतली पाहिजे’.