रसिका शिंदे-पॉल
गणेशोत्सव मंडळ म्हटलं की डोळय़ासमोर येतात ते दिवस-रात्र एक करून काम करणारे कार्यकर्ते. यात तरुण पिढीचा सहभाग अधिक असतोच. मंडळातील कार्यकर्ते म्हणजे चौकातील गप्पा-गोष्टी, वाद-विवाद आणि बरंच काही.. महाराष्ट्रातील चौकाची आणि गणेशोत्सव मंडळाची पार्श्वभूमी असलेली निराळी गोष्ट दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड ‘चौक’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. ‘चौक’ या चित्रपटात गणेशोत्सव मंडळ आणि राजकारणी त्यांच्या सोयमीने या तरुण कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने वापरून घेतात आणि त्यामुळे या तरुणांची होणारी वाताहत या वास्तव विषयावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.
महाविद्यालयात असताना मी एकांकिका दिग्दर्शित केल्या होत्या. नाटकात, चित्रपटात काम केले होते. या अभिनयाच्या अनुभवातून आजच्या तरुण पिढीला भावेल असा चित्रपट करायचं मनात होतं. आजच्या युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर काय होऊ शकतं याचाही विचार यादरम्यान सुरू होता. संघटनात्मक काही काम असेल, राजकारणात तरुणांना प्रवेश करायचा असेल किंवा अन्य कोणत्याही बाबी साध्य करायच्या असतील तर अशा परिस्थितीत संयमीपणा ठेवून सर्व गोष्टींचा सारासार विचार कसा करावा आणि सामाजिक भान कसं ठेवावं हे चित्रपटाच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘चौक’ चित्रपट करायचं ठरवलं, असं दिग्दर्शक देवेंद्र गायकवाड यांनी सांगितलं. देवेंद्र गायकवाड यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
नावामागचं गुपित..
सगळय़ांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली मैत्री, चौकाने बघितलेल्या पिढय़ा आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळय़ाची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’! चौकात चार वेगवेगळय़ा वाटा एकत्रही येतात आणि विविध दिशेलादेखील जातात. ही प्रत्येक वाट चांगलीही असते आणि वाईटही असते; यात आपण कोणती वाट निवडावी आणि दिशाहीन न होता आपलं भवितव्य कसं घडवावं हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. या सगळय़ाच्या मुळाशी असलेला चौक म्हणूनच चित्रपटाचं शीर्षक निवडण्यात आलं. स्वानुभवातून घडलेला चित्रपट म्हणजे ‘चौक’ आहे, असंही देवेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
कलाकार कधीच तृप्त नसतो
मुळात ‘चौक’ चित्रपटाचा विषय आजच्या तरुणाईला आपलासा वाटेल असा असल्या कारणाने हा चित्रपट स्वीकारल्याचं अभिनेता किरण गायकवाड याने सांगितलं. हल्लीची तरुण पिढी व्यसनांच्या अधिक आहारी जाताना दिसते आहे. समाजमाध्यमांचे व्यसन लागलेला तरुण आणि त्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतील भूमिका लोकप्रिय झाल्यानंतर ‘चौक’ चित्रपटात किरण मुख्य भूमिकेत दिसतो आहे. ‘‘कलाकार हा कधीचच तृप्त नसतो. छोटा पडदा असो वा मोठा पडदा, भूमिकेच्या बाबतीत असा भेदभाव मी एक कलाकार म्हणून कधीच केला नाही,’’ अशी कबुलीही किरणने या वेळी दिली. अभिनयाच्या जोरावर प्रत्येक कलाकार त्याची कला सिद्ध करत असतोच, असंही त्याने सांगितलं.
मी अपक्ष..
‘चौक’ या चित्रपटाचं कथानक मंडळातील तरुण कार्यकर्ते आणि राजकीय पक्षातील नेते यांच्याभोवती फिरतं. चित्रपटाचा विषय राजकारणाकडे काहीसा झुकणारा असला तरी राजकीय धोरणाचा विचार करता मी अपक्षच आहे, असं किरण सांगतो. कुठल्याही एका पक्षाला जोडून न घेता प्रत्येक पक्षाच्या राजकारणी नेत्यांमधील एक तरी चांगला गुण मला आवडतो, असं किरणने सांगितलं. ‘‘मी कुठल्याही एका पक्षाचा नाही आहे. मला सगळे पक्ष एकसारखे वाटतात. प्रत्येक नेत्याची विचारधारा मला आवडते. राज ठाकरे यांचा बेधडकपणा, शरद पवार यांची हुशारी, उद्धव ठाकरे यांचा संयमीपणा, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्यातील ठेहराव आणि संथपणाही मला आवडतो,’’ अशा दिग्गज राजकीय नेत्यांमधील एकेक गुण आवडत असल्याचं किरण याने सांगितलं.
‘चौक’ चित्रपटाने माझी निवड केली
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पिंजरा’ या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरांत अभिनेत्री संस्कृती बालगुडे पोहोचली; परंतु माझ्यातील अभिनय कौशल्यापेक्षा नृत्य कौशल्याकडेच जास्त लक्ष दिल्यामुळे माझ्या वाटेला विविधांगी भूमिका आल्या नाहीत, अशी खंत संस्कृतीने बोलून दाखवली. ‘चौक’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या संस्कृतीने मराठी मनोरंजनसृष्टीत अभिनेत्री म्हणूनही मी चांगली आहे हे पटवून देण्यासाठी आजही कष्ट करत असल्याचं सांगितलं. मात्र, ‘चौक’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्यातील अभिनयाचे विविध पैलू मला उलगडण्याची संधी मिळाली आहे. आणि या चित्रपटानेच माझी स्वत:हून माझी निवड केल्याचं सांगत प्रत्यक्ष जीवनात मात्र आपण या व्यक्तिरेखेपेक्षा निराळे आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी शिकता आल्या, अशा शब्दांत आपला आनंदही संस्कृतीने व्यक्त केला.