सुवर्णकमळ पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने नव्याने चित्रपटाबद्दल सुरू
झालेली चर्चा ते एक दिग्दर्शक म्हणून दिवसेंदिवस वाढत जाणारा परीघ याबद्दल नागराज मंजुळे यांच्याशी केलेली बातचीत.
* राष्ट्रीय पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाल्यानंतर या पुरस्काराचे नेमके काय महत्त्व जाणवत आहे?
– ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. पुन्हा तोच पुरस्कार मिळालाय. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून योग्य पद्धतीने आपण काम करीत आहोत ही जाणीव सुखावणारी आहे. माझा पहिला पुरस्कार चोरीला गेला त्या दिवशी ‘फँड्री’चा चित्रीकरणाचा शेवटचा दिवस होता. माझे आई-वडील सेटवर आले होते. नेमके त्याच दिवशी चोरांनी घर फोडले आणि पुरस्कार चोरीला गेला. हा योगायोग नक्कीच आहे की, तोच पुरस्कार मला परत मिळालाय. तेही सुवर्णकमळ पुरस्कार. त्या वेळी मला भेटलेल्या लोकांनीही तुला हा पुरस्कार परत मिळणार आहे, अशाच शुभेच्छा दिल्या होत्या. अशा अनेक गोष्टी या पुरस्काराशी जोडल्या गेल्या आहेत. पण राष्ट्रीय पुरस्कार मला इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपेक्षा महत्त्वाचा वाटतो. कारण त्याचे संदर्भ हे आपल्या लोकांशी जास्त जोडलेले असतात.
* राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक म्हणून जबाबदारी वाढली आहे असे वाटते का?
– पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी येते, असे मी मानत नाही. जबाबदारी तुमची व्यक्तिगत असते. खूप प्रेक्षक चित्रपट पाहतात म्हणून तुमची जबाबदारी वाढते, असेही नाही. ती नेहमीच तुमच्याबरोबर असते. प्रामाणिकपणे काम करीत राहणे हीच मला माझी जबाबदारी वाटते.
*‘फँड्री’च्या आधीचे जगणे आणि आता यात काय फरक जाणवतो?
– पुरस्कार मिळाल्यानंतर किंवा एकंदरीतच ‘फँड्री’नंतर माझा परीघ विस्तारला आहे. म्हणजे गेले १५ दिवस मी अमेरिकेत फिरतोय. फेसबुकद्वारे जे माझे मित्र झाले त्यांनीच मला इथे बोलावले. अमेरिकेत येणे माझ्यासाठी गंमतच आहे. एक काळ असा होता की मुंबईत येतानाही भीती वाटायची. आता अमेरिकेत आल्यापासून मी कॅलिफोर्निया, सॅनफ्रान्सिस्को, फिलाडेल्फिया आदी शहरांमधून फिरतोय. निश्चितच माझा परीघ विस्तारलाय. पण मी आहे तसाच आहे.
* परदेशांतून फिरताना ‘फँड्री’वरती काय प्रतिक्रिया मिळताहेत?
– अमेरिकेतील लोक किंवा तिथले भारतीय लोक या दोघांनाही ‘फँड्री’ खरोखर भारताचे प्रतिनिधित्व करणारा चित्रपट वाटतो. भारताची पाळेमुळे जिथे रुजली आहेत अशा एका विश्वाची झलक या चित्रपटाच्या रूपाने पाहायला मिळाली, असे त्यांना वाटते. एकीकडे अशा प्रकारचे जगणे असू नये अशीही चर्चा होते. आणि असे होऊ नये म्हणून काय करता येईल यावरही विचारमंथन होते. ‘मोटारसायकल डायरी’ या चित्रपटाची निर्माती कॅरन हिच्याशी माझी भेट झाली. तिनेही ‘फँड्री’ आवडल्याचे सांगितले आणि ती स्वत: हॉलीवूडची निर्माती असल्याने आपण इथे काही वेगळ्या विषयांवर काम करूयात, असेही ती आवर्जून म्हणाली. हे सगळेच अनुभव खूप छान आहेत.
* दिग्दर्शक म्हणून यापुढेही आगळ्यावेगळ्या विषयांवर चित्रपट करणार का?
– आपले जे नेहमीचे जगणे आहे तेच चित्रपटातून मांडणे मला जास्त आवडते. आपल्या देशात आजही अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक लोकांच्या अनेक कथा आहेत, ज्यांच्याबद्दल आपण कधीच बोलत नाही. ज्यांना चित्रपटांतून किंवा साहित्यातूनही कधी वाव मिळालेला नाही त्या गोष्टी चित्रपटांतून जास्तीतजास्त मांडायला हव्यात. दिग्दर्शक म्हणून माझ्या पद्धतीने त्या मांडत राहणे जास्त महत्त्वाचे वाटते.
* प्रेक्षकांचा बदललेला दृष्टिकोनही ‘फँड्री’च्या यशाला कारणीभूत झाला असे वाटते का?
– चांगला चित्रपट आणि चांगला प्रेक्षक हे एकमेकांना पूरक ठरले तरच चित्रपटाला यश मिळते. कधीकधी चांगले चित्रपट येत नाहीत. तर कधीकधी प्रेक्षक चांगल्या चित्रपटांकडे पाठ फिरवितात. हे दोन्ही बाजूंनी घडत असते. मराठी चित्रपट दिग्दर्शक नेहमीच आपल्या चित्रपटांतून काहीतरी विचार मांडण्याचा प्रयत्न करीत असतात. हिंदी चित्रपटांसारखे वरवरचे विषय मराठीतून मांडले जात नाहीत. त्यामुळे मराठीत चांगले, दर्जेदार, आशयसंपन्न चित्रपट पाहायला मिळतात असा सूर सगळीकडे उमटताना दिसतो आहे. मग अशा चांगल्या चित्रपटांना चांगले प्रेक्षक मिळाले तर चित्रपटकर्त्यांनाही नक्कीच बळ मिळेल.
* ‘फँड्री’ केल्यानंतर, त्याचे कौतुक होत असताना अनेकांच्या आमंत्रणावरून तुमचे देशोदेशी फिरणे होत आहे. या सगळ्या प्रवासातून, भेटींतून, वेगवेगळ्या स्तरावरच्या व्यक्तींशी चर्चेतून काय गवसले आहे?
– दिवसागणिक शहाणा होतो आहे. अक्कल येणे म्हणजे काय याची जाणीव आता होतेय. आतापर्यंत मी माझे गाव, पुण्यात शिकलो म्हणून पुणे हे सोडून बाकी कुठे फिरलो नव्हतो. गेल्या चार वर्षांत मी ठिकठिकाणी फिरतोय. वेगवेगळे लोक, निरनिराळे देश, त्यांचे विचार या सगळ्यांतून माझ्या दृष्टिकोनात भरच पडत चालली आहे. अमेरिकेत मला मेक्सिकन, कृष्णवर्णीय लोक भेटले. त्यांच्या व्यथा, त्यांचे जगणे नव्याने समजले. कुठेतरी त्यांचे जगणे आपल्यासारखेच होते हे जाणवले, तरी अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये आता या लोकांची परिस्थिती कशी आहे, स्वातंत्र्याचे मूल्य ते कसे करतात अशा कित्येक गोष्टी नव्याने कळू लागल्या आहेत. मी फेसबुकवर एक फोटो टाकला होता, ज्यात मी एका उंचीवर उभा आहे, जिथून मला संपूर्ण अमेरिका दिसतेय, भलामोठा समुद्र दिसतोय. हे सगळे नजरेत साठवल्यानंतर माझ्या मनात विचार उमटला होता की, तुमच्या उंचीवरून तुमच्या नजरेच्या आवाक्यात काय काय येऊ शकते हे निर्धारित होते. आपण जितक्या मोठय़ा नजरेने जग पाहू तितके ते तुम्हाला जास्त कळू लागते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा