बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत हिचा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. भारताच्या स्वांतत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा ‘मणिकर्णिका’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. कंगानच्या दिग्दर्शनाची किनार लाभलेल्या या चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वी खास शो राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी ठेवण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चा खास शो आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रपतींसमवेत कंगना आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित राहणार आहे. ‘मणिकर्णिका’ २५ जानेवारीला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात कंगनानं राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे याच चित्रपटातून कंगना दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहे.
‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा चित्रपटाच्या रुपानं पडद्यावर सादर करण्यासाठी आम्ही सारेच खूप उत्सुक आहोत’ असं कंगना याप्रसंगी म्हणाली. पीटीआयशी बोलताना तिनं राष्ट्रपतींसाठी ‘मणिकर्णिका’चा खास शो आयोजित करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘मणिकर्णिका’च्या निमित्तानं छोट्या पडद्यावरची अभिनेत्री अंकिता लोखंडेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.