मार्क वेब या दिग्दर्शकाने काही वर्षांपूवी ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’ नावाचा रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमा बनविला होता. हा चित्रपट पाहणाऱ्यांना खासमखास लक्षात असेल, त्यातली कबुतरछापी गुलूगुलू अवस्थेला टाळून सुरू असलेली प्रेमविरोधी कथा. याच चित्रपटामध्ये शेवटाला तथाकथित नायक-नायिका किंवा प्रेमी-प्रेमिका यांच्या भेटीचा चित्रपटीय आणि वास्तव आविष्कार मोठय़ा गमतीशीरपणे पडद्याचे दोन भाग करून मांडला आहे. एकात अर्थातच नायकाला पाहून नायिका बावरते. त्याचे स्वागत करते. मग दोघे एकमेकांच्या बाहुपाशामध्ये विसावतात. दोघेही अत्यानंदाच्या भावनेने खिदळत-बागडत राहतात. मैफलीत चंद्रप्रकाशासारखी मोहमयी अवस्था तयार होते. या गोऽडगोऽड अवस्थेच्या बाजूचे वास्तवदर्शी वर्णन फार बरे नाही. नायकाला पाहून नायिका औपचारिक स्मितापलीकडे जात नाही. मैफल एका भलत्याच अवस्थेत नायिका व तिच्यासोबत विवाह करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रित झालेली असते आणि हा तथाकथित नायक अन्य बघ्यांतील एक सामान्य रूपामध्ये परावर्तित झालेला असतो..
चित्रपटातील नेहमीचीच सुखांत वा शोकांत गोष्ट पारंपरिक पद्धतीने न सांगता त्यातील आशयांच्या चौकटींमध्येदेखील प्रयोगांच्या शक्यतितक्या प्रयोगचेष्टा करीत उलगडत असल्यामुळे हॉलीवूडमध्ये रोमॅण्टिका अजूनही तगून आहेत. आजच्या युगातील खऱ्याखुऱ्या कचकडय़ाच्या प्रेमचिंतनावर बेतलेला ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’ अलीकडल्या रोमॅण्टिकांमधली उत्तम निर्मिती आहे. हा चित्रपट बनवल्यानंतर या दिग्दर्शकाने ‘स्पायडरमॅन’ या फारच फॉम्र्युलेबाज चित्रपटाची निर्मिती केली. पण त्यानंतर मार्क वेबने तयार केलेला ‘गिफ्टेड’ हा ताजा चित्रपट ‘फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समर’मधल्या कसदार प्रयोगांची आणि खास करून लेखात सुरुवातीला उल्लेख केलेल्या भागाची आठवण करून देणारा आहे.
कोणत्याही नेहमीच्या परिचित चित्रप्रकारामध्ये वाढून ठेवलेले घटक निश्चित टप्प्यांतील संघर्षांचे देखावे करून अंतिम अपेक्षित शेवटाच्या वळणांवर चित्रपटाला नेतात. मेलोड्रामिक वाक्ये, कढ-आसू-हसू यांच्या आवर्तनांचा बेतीव पाढा त्यात असतोच. असामान्य गणितीय कौशल्याची जन्मजात भेट लाभलेल्या बालनायिकेवरच्या गिफ्टेड या चित्रपटात यातले काहीएक चुकलेले नाही. तरी हा चित्रपट आजच्या पालक आणि बालकांमधील वाढत चाललेल्या मानसिक द्वंद्वाविषयी बोलतो, गुण हेरून मुलांवर मोठय़ा अपेक्षा लादत हिरावून घेतल्या जाणाऱ्या त्यांच्या बालपणाविषयी बोलतो आणि जन्मजात कौशल्याचा विकास करताना सामान्य आयुष्यापासून मुलांना वंचित ठेवणाऱ्या आजच्या जगात सार्वत्रिक झालेल्या व्यवस्थेला समोर आणतो. ही नेहमीची गोष्ट मात्र त्याच्या सिनेवैशिष्टय़ांनी पाहणाऱ्याला सुंदर क्षणांचा साक्षीदार करते.
चित्रपटाला सुरुवात होते ती आई-वडिलांचे छत्र हरविल्याने मामासोबत राहणाऱ्या मॅरी (मॅकाना ग्रेस) या सात वर्षांच्या मुलीच्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून. तिच्या आवडीच्या गणित या विषयाचे आणि इतर मूलभूत शिक्षणाचे धडे तिने आधीच आत्मसात केले असल्याने शाळेत जाण्यास ती नाखूश असते. फॅ्रन्क (ख्रिस इव्हान) या तिच्या मामाला मात्र मॅरीने शाळेत जाऊन तिच्या वयाच्या मुलांमध्ये मिसळून त्यांच्यासारखे साधारण आयुष्य जगावे ही अपेक्षा असते. असामान्य बुद्धिमत्तेच्या बहिणीच्या आत्महत्येनंतर फॅ्रन्क मॅरीला घेऊन इतर कुटुंबीयांपासून अज्ञात जागी राहत असतो. मॅरी पहिल्याच दिवशी आपली गणितातील मोठय़ांनाही न सुटणाऱ्या कोडय़ांना सहज सोडविण्याची धमक दाखविते. बोनी (जेनी स्लेट) ही शिक्षिका तिच्या या गणितीय गुणांना हेरते. त्यांना प्रोत्साहन देते. एका प्रसंगानंतर शाळेतील मुख्याध्यापक बाई फॅ्रन्कला बोलावून या मुलीची रवानगी मोठय़ा शाळेत करण्याचा आग्रह धरते. फ्रॅन्क ते नाकारतो. त्यामुळे मुख्याध्यापिका मॅरीचा जन्मैतिहास शोधून आज्जीशी संधान साधते. आज्जीला मॅरी आणि फ्रॅन्कचा सुगावा लागल्यानंतर तिच्या ताब्यासाठी ती कोर्टात दावा करते. चित्रपट गमतीशीर संघर्षांत या असाधारण क्षमतेच्या मुलीवरचे लक्ष जराही ढळू देत नाही. इथे तिचे मामासोबत, चाळीसेक वर्षांची शेजारीण मैत्रीण रॉबर्टा आणि एक डोळ्याचा मांजर यांच्यासोबतचे नाते दर क्षणाला फुलत राहते. आज्जीचा नातीवरील हेतुपूर्वक हक्क दाखविण्याचा अट्टहास आणि त्या हेतूंपासून परावृत्त करण्यासाठी मामाचा तिला सामान्य जीवन जगू देण्याचा आग्रह यांतल्या अतितटीच्या मतभेदांतून चित्रपट निर्णायक वळणांकडे झेप घेतो. सुरुवातीला सांगितलेल्या फाइव्ह हण्ड्रेड डेज ऑफ समरसारखेच या चित्रपटात अनेक अविस्मरणीय क्षण आहेत.
चित्रपट तीन पातळ्यांवर सुरू राहतो. पहिली पातळी मॅरीच्या गणित कौशल्याची, दुसरी फ्रॅन्क आणि बोनीच्या फुलत जाणाऱ्या नात्याची आणि तिसरी आज्जीची मॅरीचा ताबा मिळविण्यासाठी चाललेल्या धडपडीची.
लहान मुलांची एखाद्या विषयातील गती लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर अकाली असंख्य अपेक्षांची ओझी लादून बालपणातल्या सहज आनंदाला ती मुकू नयेत, यासाठी आपल्याकडे कोणतीही काळजी घेतली जात नाही. कुटुंब आणि शाळा या दोन्ही ठिकाणी कौतुकांच्या वारेमाप माऱ्यात मुलांना पोक्त बनविणाऱ्या सर्वच यंत्रणेमध्ये हा चित्रपट पाहणे आवश्यक आहे. मेलोड्रामायुक्त ही नेहमीचीच गोष्ट असली तरी एक चांगली अनुभूती मिळण्याची खात्री नक्कीच आहे.