अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनची स्टाइल आणि डायलॉगचे तर असंख्य लोक चाहते झाले आहेत. याशिवाय या चित्रपटातील ‘सामी सामी’ आणि ‘ऊं अंटावा’ हे दोन गाणी तर प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत आणि आता या गाण्याचं वेड चक्क स्पायडरमॅनलाही लागलं आहे.
सध्या सोशल मीडियावर स्पायडरमॅनचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो ‘सामी सामी’ गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ अल्लू अर्जुनचा भाऊ अल्लू शिरिषनं त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. अल्लू शिरिषचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अल्लू शिरिषनं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, ‘स्पायडर मॅन ‘पुष्पा’च्या ‘रा रा सामी’ गाण्यावर डान्स करत आपलं सक्सेस सेलिब्रेट करताना दिसत आहे. अल्लू अर्जुन आणि स्पायडरमॅनचा चाहता असण्याच्या नात्याने… वाह! हा भारत आहे बॉस. स्पायडरमॅन, जबरदस्त मित्रा.’ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पायडरमॅनच्या वेशातील एक व्यक्ती रश्मिका मंदानाच्या हूकस्टेप करताना दिसत आहे.
‘पुष्पा : ज राइज’ चित्रपटाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित आहे. ज्यात अभिनेता अल्लू अर्जुननं ‘पुष्पा’ ही व्यक्तीरेखा साकारली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदानाचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. एवढंच नाही तर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ पाहायला मिळत आहे.