रिषभ शेट्टी यांच्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला होता. पुढे तो हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम अशा भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला. हिंदीमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. प्रेक्षकांनी दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या दोन बिगबजेट चित्रपटांऐवजी हा चित्रपट पाहणे पसंत केले. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी या चित्रपटाचे स्क्रीनिंग केले जाणार आहे असे म्हटले जात होते. सिनेसृष्टीतील कलाकारांपासून अन्य सेलिब्रिटींना या चित्रपटाचे वेड लागले आहे.
अध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांनी नुकताच ‘कांतारा’ पाहिला आहे. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या बंगळुरूच्या आश्रमांमध्ये रवी शंकर आणि त्यांच्या अनुयायांसाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “या चित्रपटाला मिळणाऱ्या यशाचा संपूर्ण कर्नाटक राज्याला अभिमान आहे. या चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांनी केलेला अभिमान फार प्रभावशाली आहे. कांतारामध्ये मालेनाडूची महानता सुंदर पद्धतीने दाखवण्यात आली आहे”, असे म्हणाले.
रिषभ यांनी या खास स्क्रीनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी “वेळात वेळ काढून कांतारा पाहिल्याबद्दल मी गुरुजींचे आभार मानतो. बंगळुरूच्या आश्रममध्ये आमचा चित्रपट दाखवला जाणं हे मी माझं आणि आमच्या चित्रपटाचं सौभाग्य समजतो. संस्कृतीशी जोडलेले राहण्याची आमची इच्छी आहे आणि या परंपरांना पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत राहणार आहे”, असे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा – “…म्हणून शाहरुख जमिनीवर झोपायचा”; आदित्य नारायणने सांगितला ‘परदेस’ सिनेमाचा किस्सा
रिषभ शेट्टी यांनी ‘कांतारा’चे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. यासह त्यांनी शिवा हे प्रमुख पात्र साकारले आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सप्तमी गौडा, किशोर, अच्युत कुमार अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. कर्नाटकमधील लोककथांचा प्रभाव चित्रपटामध्ये प्रकर्षाने जाणवतो. या चित्रपटामुळे ‘भूत कोला’ या पारंपारिक नृत्यप्रकाराला प्रसिद्धी मिळाली आहे.