प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं… हेच सेम – सेम प्रेम… प्रेमाच्या दिवशी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन्स डे’ ला सर्वत्र पसरलं. सगळं जग गुलाबी झालं होतं… आणि चहुकडे प्रेमाचे वारे वाहत होते. या प्रेमदिनी काही प्रेमवीर आपल्या प्रेयसीचं मन जिंकण्यात यशस्वी झाले तर काही अयशस्वी ठरले. आणि यशस्वी प्रेमवीरांच्या जोड्या झाल्या. या प्रेमवीरांच्या जोड्यांबरोबरच आणखी एक हटके जोडी या दिवसाच औचित्य साधून मराठी मनांवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ही जोडी आहे… गश्मीर आणि स्पृहाची…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होय, गश्मीर महाजनी आणि स्पृहा जोशी ही विसंगत जोडी फिल्मी किडा प्रॉडक्शन्स यांच्या आगामी मराठी चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी चित्रपटाचे सह-निर्माते रवी सिंह, दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्याबरोबर इतर कलाकार मंडळी उपस्थित होती.

याविषयी बोलताना दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी, “स्पृहा – गश्मीर ही जोडी चित्रपटासाठी योग्य वाटल्याचे म्हटले. तर स्पृहा आपली चांगली मैत्रीण असूनही अद्याप तिच्यासोबत काम करता आले नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. ‘डबल सीट’च्या अंकुश आणि मुक्ताप्रमाणेच गश्मीर आणि स्पृहानेही अजून एकत्र काम केलेलं नाही. त्यामुळे शूटींगदरम्यान त्यांच्यात फुलत जाणारी केमिस्ट्री या विषयाची गरज आहे. आणि ही केमिस्ट्री अनुभवणं नक्कीच मजेशीर असेल असा विश्वास समीर विध्वंस यांनी व्यक्त केला.”

या चित्रपटाची निर्मिती पी. एस. छतवाल आणि रीचा सिन्हा यांनी केली असून सहनिर्माते रवी सिंह आहेत. नात्यांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटासाठी सौरभ, ह्रषिकेश दातार आणि जसराज जोशी यांचं संगीत असणार आहे तर छायाचित्र दिग्दर्शन प्रसाद भेंडे यांचं आहे. तर अशी ही, व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेली ही हटके जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने नेमकं काय घेऊन येत आहे हे लवकरच कळेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spruha joshi and gashmeer mahajani came together for sameer vidwans upcoming movie