Spruha Joshi : स्पृहा जोशीने मराठी मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटच नाही तर कविता आणि उत्कृष्ट निवेदनातून स्पृहाने चाहत्यांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. काही दिवसांपूर्वीच तिची ‘सुख कळले’ ही मालिका बंद झाली. मात्र, स्पृहाचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. अशात आता स्पृहा पुन्हा एकदा एका नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
स्पृहा जोशीने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या नाटकाची घोषणा केली आहे. रंगभूमीवर गाजलेलं ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्पृहाने या नाटकाचे एक पोस्टर आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. यात एका व्हिडीओमध्ये कलाकार नाटकाची तालीम करताना दिसत आहेत. ‘पुरुष’ नाटकाच्या घोषणेचे पोस्टर शेअर करत स्पृहाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून. सादर करत आहोत, ज्येष्ठ नाटककार कै.जयवंत दळवी लिखित, राजन ताम्हाणे दिग्दर्शित एक अभिजात नाट्यकृती.. पुरुष!”
हेही वाचा : अभिषेक बच्चनने सांगितली बिग बींची ‘ती’ विचित्र सवय; म्हणाला, “ते इतरांचे…”
‘पुरुष’ या नाटकामध्ये स्पृहा जोशी, शरद पोंक्षे आणि अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तसेच यामध्ये अनुपमा ताकमोगे, नेहा परांजपे आणि निषाद भोईर हे कलाकारही महत्वाची पात्रे साकारताना दिसणार आहेत. हरहुन्नरी कलाकारांची नावे वाचून तुम्हालाही नाटक पाहण्याची इच्छा झाली असेल तर हे नाटक केव्हा सुरू होणार याची माहिती जाणून घेऊ.
‘पुरुष’ हे नाटक डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होणार आहे. आता डिसेंबर महिन्यात कोणत्या तारखेला नाटक सुरु होईल त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या नाटकाची निर्मिती शरद पोंक्षे, समिता काणेकर आणि श्रीकांत तटकरे करत आहेत.
‘पुरुष’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर पाहता येणार आहे. १९८२ मध्ये पहिल्यांदाच हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी नाना पाटेकर, रिमा लागू, सतीश पुळेकर, चंद्रकांत गोखले, उषा नाडकर्णी अशा दिग्गज कलाकारांनी यात भूमिका साकारल्या होत्या. या नाटकातील कथानक प्रेक्षकांना फार आवडलं होतं. त्यामुळे पुढे ९० च्या दशकानंतर या नाटकाचे हिंदी प्रयोगही झाले होते.
हेही वाचा : Video: सूर्या दादाने सहकलाकारांबरोबर केला ‘मेहबूबा’ गाण्यावर डान्स; अभिनेत्रीच्या कमेंटने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “जाळ, धूर…”
१९८२ मध्ये आलेल्या पुरुष या नाटकात लेखक जयवंत दळवी यांनी पुरुषी मनोवृत्ती म्हणजेच गेंड्याची कातडी असा उल्लेख केला जाणारा पुढारी कसा असतो, त्याची मानसिकता कशी असते हे दाखवलं होतं. या नाटकाचे कथानक इतके भन्नाट आहे की, यावर आधारित एक वेब सीरिज देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे नाटक स्पृहा जोशी, शरद पोंक्षे, अविनाश नारकर अशा नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.