२०१९ ची लोकसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच अनेक बॉलिवूड कलाकार राजकारणात प्रवेश करत आहे. तर काही अभिनेत्रीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण राजकारणात उतरलेल्या अभिनेत्रींना अपमानकारक पद्धतीने पाहिलं जातं अशी टीका अभिनेत्री स्पृहा जोशीने केली आहे. अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरणाऱ्या स्त्रियांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. पण असं कधी अभिनेत्यांसोबत झालेलं नाही, असं परखड मत स्पृहाने मांडलं आहे. याविषयी फेसबुकवर तिने मोठी पोस्ट लिहिली आहे.

‘सध्या बंगालमध्ये मिमी आणि नुसरतच्या सो कॉल्ड ‘रिव्हिलिंग’ कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणारे ‘मीम्स’ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल समाजवादी पक्षाच्या एका नेत्यानं म्हटलं. – “त्या आपल्या ‘घुंगरू’ आणि ‘ठुमक्यांनी’ लोकांना तल्लीन करून टाकतील आणि त्यांच्या रात्री ‘रंगीन’ करून टाकतील!” किती भयानक वाटतं हे सगळं. आणि हा प्रचार का? त्या फक्त अभिनेत्री आहेत म्हणून? मनोरंजनाच्या क्षेत्रात आहेत म्हणून? आणि मग फक्त अभिनेत्रींच्याच वाट्याला हे शेमिंग का? अभिनय करून मग राजकारणात उतरणाऱ्या अभिनेत्यांना / हिरोंना का नाही या सगळ्याला तोंड द्यावं लागत?,’ यांसारखे गंभीर प्रश्न स्पृहाने या फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केले आहेत.

निवडणुकांच्या प्रचारावरुन प्रश्न उपस्थित करतानाच स्पृहाने स्त्रियांना एकवटण्याचं आवाहन केलं आहे. ‘या सगळ्याच्या पलीकडे मुळात सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की या सगळ्यात आपण बायका एकमेकींच्या पाठीशी उभं राहू का? सगळं बाजूला सारून आपल्यातला स्त्रीत्वाचा समान धागा आपल्याला एकमेकींसाठी लढायची एकमेकींसाठी बोलायची ताकद देईल का ? कारण ‘बायकांना मुळातच अक्कल नसते’ हे वाक्य आपण बायकाच सगळ्यात जास्त वेळा बोलत असतो. आणि कळतनकळत पिढ्यापिढ्यांच्या वारशासारखा आपला त्यावर विश्वासही बसलेला असतो.’ असं तिने लिहिलं.