‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवा कार्यक्रम
दूरचित्रवाहिन्यांवरील दैनंदिन मालिकांबरोबरच खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची चांगली पसंती आहे. याच कार्यक्रमांच्या मालिकेत आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘किचनची सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे. विविध मालिका आणि चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटविलेली अभिनेत्री स्पृहा जोशी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील पाककृतींविषयी सादर होणारे हे कार्यक्रम म्हणजे स्वयंपाकाची आवड असणाऱ्या गृहिणी आणि खवय्यांसाठी मेजवानीच असते. मराठीसह हिंदीतील जवळपास प्रत्येक प्रमुख वाहिन्यांवर सध्या हे कार्यक्रम सुरू आहेत. ‘स्टार प्रवाह’वरील ‘किचनची सुपरस्टार’ या कार्यक्रमाची संकल्पना वेगळी आहे. आईने केलेल्या पदार्थाची चव प्रत्येकालाच आवडते, पण आईला कोणाच्या हाताची चव आवडते? याचा शोध हा कार्यक्रम घेणार असून कोणाच्या हाताला पारंपरिक चव आहे, हे यात ठरविण्यात येणार आहे.
स्पर्धात्मक स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात घरातील सून आणि मुली त्यांच्या कुटुंबाचा एक खास खाद्यपदार्थ बनविणार आहेत. याबरोबरच तज्ज्ञ ‘शेफ’नी दिलेल्या विविध सूचना यात सादर केल्या जाणार आहेत.
महाराष्ट्राची खाद्यपरंपरा आणि वेगवेगळ्या प्रांतांतील भोजनाच्या पद्धती, ठिकाणे यांची माहितीही दिली जाणार आहे. ‘स्टार प्रवाह’वर पहिल्यांदा अशा प्रकारचा कार्यक्रम सादर होत असून सुगरण गृहिणींसाठी स्पर्धा, आहार आणि आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना, योग्य आहाराविषयी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन, महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल्स, फूड सेंटरची माहिती यात दिली जाणार आहे.
अभिनेत्री स्पृहा जोशीचे सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्टय़ असून ती एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे ‘स्टार प्रवाह’कडून सांगण्यात आले. सोमवार ते शनिवार दररोज दुपारी एक वाजता ‘स्टार प्रवाह’वर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.
स्पृहा जोशी ‘किचनची सुपरस्टार’ होणार!
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘किचनची सुपरस्टार’ हा कार्यक्रम सुरू होत आहे.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 13-10-2015 at 04:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spruha joshi will become kitchen superstar