स्पृहा जोशी ही एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत चित्रपट, मालिका, नाटक, वेब सिरीज अशा विविध माध्यमात भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री, कवियित्री, सूत्रसंचालिका असण्याबरोबरच स्पृहाचा एक युट्यूब चॅनेलही आहे. पण काही दिवसांपूर्वी तिचा हा चॅनल हॅक झाला होता अशी माहिती तिने नुकतीच शेअर केली.
स्पृहा एक लोकप्रिय युट्यूबर आहे. ‘स्पृहा जोशी’ हा तिचा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे. गेल्याच वर्षी तिच्या या चॅनलने १ लाख सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला. या चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या कविता, तिने वाचलेली पुस्तकं यांबद्दल माहिती देण्याबरोबरच फूड व्लॉगिंग आणि ट्रॅव्हल व्लॉगिंगही ती करते. तिच्या या चॅनेलवर आठवड्याला दोन किंवा तीन व्हिडीओज ती पोस्ट करत असते. परंतु गेल्या काही दिवसात तिने एकही व्हिडीओ या चॅनलवरून शेअर केला नाही. आता यामागचं कारण तिने सांगितलं आहे.
आणखी वाचा : अश्नीर ग्रोव्हरने घेतला उशिरा लग्न करण्याच्या तरुणांच्या निर्णयावर आक्षेप, म्हणाला, “लवकर लग्न केल्याने…”
स्पृहाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं, “गेल्या अनेक दिवसांपासून मला आपला युट्यूब चॅनेल का दिसत नाहीये? हे विचारण्यासाठी बऱ्याच जणांचे फोन, ईमेल्स, मेसेजेस येत होते. पण आपला युट्यूब चॅनल हॅक झाला होता आणि तो डिलीट केला गेला होता. पण मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की, संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमांनंतर आपला युट्यूब चॅनेल जसाच्या तसा परत मिळवण्यात आम्हाला यश आलं आहे आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला सगळे व्हिडीओ तिथे पाहायला मिळतील. आता लवकरच आणखीन नवे व्हिडीओ घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत.”
हेही वाचा : “अभिनेत्री होण्यासाठीचे गुण माझ्यात नाहीत…” स्पृहा जोशीच्या पोस्टने वेधलं लक्ष
दरम्यान, स्पृहा लवकरच ‘लोकमान्य’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारणार आहे. नुकतीच तिने या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात केली. जवळपास १० वर्षांनी ती ऐतिहासिक भूमिकेत दिसणार असल्याने तिला या मालिकेत पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.