बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवीबद्दलची प्रेम भावना व्यक्त करत दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आत्मचरित्रात एक अध्याय श्रीदेवीला समर्पित केला आहे. अध्यायात राम गोपाल वर्मा यांनी श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी कधीच माफ करणार नाही, असे विधान केले आहे.
राम गोपाल वर्मा यांचे ‘गन्स अँड थाईस’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले असून या पुस्तकात वर्मा यांनी श्रीदेवीची तुलना सौंदर्यदेवतेशी केली आहे. श्रीदेवी ही एक परी आहे. तिला बोनी कपूर यांच्या स्वयंपाक घरात चहा बनवताना पाहून फार दु:ख होतं. बोनी कपूर यांनी एका परीला स्वर्गातून स्वयंपाक घरात आणलं त्यांना मी कधीच माफ करणार नाही, असे वर्मा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच आपल्या आत्मचरित्रातील श्रीदेवीवरील अध्याय हे माझे प्रेमपत्र असल्याचे राम गोपाल वर्मा म्हणाले.
मला श्रीदेवी बद्दल आकर्षण होतं. कोणालाही कोणाही विषयी प्रेम वाटू शकतं. मग ती एखादी सामान्य व्यक्ती असो वा सेलिब्रिटी. तुम्ही त्या भावनेचा आनंद असतो आणि ही एक प्रकारची नशाच असते, असेही वर्मा म्हणाले.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या रंगीला चित्रपटाबाबतही राम गोपाल यांनी एक खुलासा पुस्तकात केला आहे. उर्मिलाच्या सौंदर्याला कॅमेरात कैद करण्यासाठीच ‘रंगीला’ चित्रपटाची निर्मिती केली, या चित्रपटामुळे उर्मिला सुपरस्टारपदी पोहचली, असे राम गोपाल यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.