बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती. त्यांच्या अचानक निधनामुळे कलाविश्वातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण, त्या बातमीवर चाहत्यांच्या आजही विश्वास बसत नाहीये. त्यांची जागा अन्य कोणतीही अभिनेत्री भरुन काढू शकत नाही अशी श्रीदेवी यांची कामगिरी होती. सतत हसतमुख राहणाऱ्या ‘श्री’ बॉलिवूडप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यातही सुपरहिट होत्या. प्रत्येक लहान लहान क्षण कसे एन्जॉय करायचे हे त्यांना चांगलंच माहित होती. त्यामुळे घरातील प्रत्येकाचा वाढदिवस असो किंवा अॅनिव्हर्सरी त्या उत्साहात सेलिब्रेट करत असत. सध्या त्यांच्याच वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रीदेवींचा हा वाढदिवस त्यांचा अखेरचा वाढदिवस ठरला.

या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रचंड आनंदी दिसत असून हा वाढदिवस त्यांचा अखेरचा ठरेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नव्हतं.हा व्हिडिओ पाहताना श्रीदेवी यांचं त्यांच्या कुटुंबासोबत असलेलं नातं आणि प्रत्येक सदस्याप्रती त्यांच्या मनात असणारी आपुलकीची भावना पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया आणि कला विश्वात हा व्हिडिओ बराच चर्चेत आला असून, पुन्हा एकदा या सौंदर्यवतीच्या आठवणी जागवल्या जात आहेत.

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गेल्या दोन वर्षांपूर्वीचा असून या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये ‘श्रीं’बरोबर ऐश्वर्या राय, रेखा, राणी मुखर्जी, शबाना आझमी, मनीष मल्होत्रा दिसून येत आहेत. दरवर्षी ‘श्रीं’च्या वाढदिवसाचं ग्रॅण्ड सेलिब्रेशन होत असते. मात्र यावेळी त्यांची उणीव साऱ्यांनाच भासणार आहे.