अनेक अभिनेत्रींचे सौंदर्य खुलवण्यात एका मराठमोळ्या कलाकाराचा हात आहे. हा कलाकार म्हणजे सुभाष शिंदे. बॉलिवूड कलाकारांना सुभाष शिंदे हे नाव काही नवं नाही. गेल्या ८ वर्षांपासून श्रीदेवींसोबत सावली सारखा फिरणाऱ्या मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या सुभाषला ही बातमी अजूनही खरी वाटत नाही. मोहित मारवाहच्या चार दिवसांच्या लग्न समारंभातही श्रीदेवी यांचा मेकअप सुभाषनेच केला होता. श्रीदेवी यांचे शनिवारी निधन झाले. सुभाष अगदी शुक्रवारपर्यंत त्यांच्यासोबत होता. पण, पुढच्या एका दिवसात होत्याचं नव्हतं होणार आहे याची पुसटशी कल्पनाही तेव्हा कोणाच्या मनात नव्हती. त्यामुळे हा त्याच्यासाठीसुद्धा एक धक्काच होता.
‘मुंबईला यायला निघालो तेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचे किंवा आजारी वाटत असल्याचे कोणतेच भाव नव्हते. नेहमीप्रमाणे त्यांनी सांभाळून जाण्याचा सल्ला दिला. तसेच मुंबईत पुढील कार्यक्रमांच्या तारखा निश्चित असल्यामुळे त्यांनी लवकर भेटण्याचं आश्वासनही दिलं. पण त्यांचं ते मायेचं बोलणं शेवटचं असेल असं स्वप्नातही वाटलं नाही. गेल्या ८ वर्षांपासून आमचा सहवास होता. त्या माझ्या एखाद्या आईसारखीच काळजी घ्यायच्या. परदेशात गेल्यावर माझी राहण्याची योग्य सोय झाली की नाही, याबद्दल त्या पहिल्यांदा चौकशी करायच्या. श्रीदेवींच्या अशा आकस्मित जाण्याने माझे व्यक्तिगत खूप नुकसान झाले. हे असं नुकसान आहे जे आयुष्यभर भरून निघू शकत नाही. माझी सिनेसृष्टीतली हक्काची आईच मला कायमची सोडून गेली,’ असे सुभाष यांनी भरलेल्या अंत:करणाने सांगितले.
वाचा : बोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्दैवी योगायोग
https://www.instagram.com/p/Bc_5jgmhSkg/
कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी श्रीदेवी हक्काने सुभाषलाच हाक मारायच्या. त्यांचा सुभाषवर एवढा विश्वास होता की जगाच्या पाठीवर कुठेही, कोणताही कार्यक्रम असला तरी मेकअपसाठी त्यांना सुभाषच लागायचा. श्रीदेवी यांच्या सौंदर्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘मुळातच त्या फार सुंदर दिसायच्या. त्यांच्यावर फार मेकअप करावा लागला असं कधी झालं नाही. नुसत्या एका काजळनेही त्यांचा चेहरा उजळून निघायचा. त्यांच्यासोबत दिवस रात्र काम केलं आहे, पण कधीही त्या थकलेल्या दिसल्या नाहीत. त्या सतत उत्साही राहायच्या त्यामुळेच आम्हालाही त्यांच्यासोबत तासन् तास काम करण्याचा हुरूप यायचा.’ सुभाषसारखेच श्रीदेवी यांचे असे अनेक सहकारी असतील ज्यांच्या आयुष्यातील श्रीदेवींची जागा आता कायमच रिक्त राहील.