‘मिस्टर इंडिया’मधलं श्रीदेवी यांचं ‘हवा-हवाई’ गाणं त्या काळातल्या सर्वांत गाजलेल्या गाण्यांपैकी एक. हे गाणं पाहताना श्रीदेवींच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहायाचे, ते गाणं ऐकायचं की नृत्य पाहायचं असा गोंधळ उडला नाही तर नवल. हा चित्रपट सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला. चित्रपट येऊन कैक वर्ष उलटली. पुढे ‘हवा-हवाई’ गाण्याचे रिमेकही आलेत. ‘शैतान’पासून ते हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘तुम्हारी सुलू’मध्येही ‘हवा- हवाई’चं रिमेक करण्यात आलं, पण श्रीदेवींच्या त्या ‘हवा-हवाई’ची गोष्टच निराळी होती. आजही हे गाणं ऐकताना गाण्याच्या सुरूवातीला श्रीदेवींच्या तोंडात असणाऱ्या वाक्याचा अर्थच कळत नाही. पण श्रीदेवींच्या चेहऱ्यावरचे जबरदस्त हावभाव, कविता कृष्णमुर्तींचा सुरेल आवाज यात प्रेक्षक इतका अडकून बसतो की या ओळींचा अर्थ तरी काय? विनाकारण या ओळी गाण्यात का आल्या? असे प्रश्न चुकूनही मनात येत नाही. पण गाण्यात या ओळी टाकण्यामागचा किस्साही तितकाच रंजक आहे.
या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी त्यावेळी बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांच्यावर होती. श्रीदेवींचं नृत्यकौशल्य आणि तिचा अभिनय या दोन्ही गुणांची सांगड घालून हे नृत्य सरोज खान यांना प्रेक्षकांच्या समोर आणायचं होतं. गाण्याचं चित्रीकरण सुरू झालं, या गाण्यात श्रीदेवींची जबरदस्त एण्ट्री दाखवण्याचं सरोज खान यांनी निश्चित केलं. यासाठी श्रीदेवींना पाळण्यातून उतरवण्याचं सरोज खाननी ठरवलं. इतकंच नाही तर श्रीदेवींची एण्ट्री आणखी प्रभावी व्हावी यासाठी त्यांनी श्रीदेवींनी पाळण्यातून बसून खाली न येता उभं राहून खाली येण्याचं त्यांनी सुचवलं. खरंतर हे मोठं आव्हानच होतं. कारण पाळण्यावर संतुलन सांभाळायचं होतं, श्रीदेवींच्या हातात पंखा होता. पायघोळ झगा पायातही येत होतं. त्यामुळे सारी कसरत एकाच हातावर होती, पण श्रीदेवींनी तेही सांभाळत एकदम दमदार एण्ट्री केली.
पण तिच्या एण्ट्रीनंतर गाणं लगेच सुरू होत होतं. खाली उतरून स्वत:ला सावरेपर्यंत काही सेकंदाचा अवधी श्रीदेवींना आवश्यक होता. पण जावेद अख्तर यांनी लिहिलेल्या गाण्यांच्या बोलांमुळे श्रीदेवींना तो वेळ मिळत नव्हता. त्यामुळे सरोज खान यांनी जावेद अख्तर यांना मै खाँबो की शहझादी या वाक्याच्या आधी काही ओळी आणखी टाकता येतील का? याची विनंती केली. पण बराच वेळ विचार केल्यानंतरही अपेक्षित ओळी या गाण्यासाठी सुचत नव्हता. चित्रीकरणासाठी पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे त्याक्षणी काही अर्थहीन शब्द सुचले ते म्हणजे ‘होलोलूलू, लस्सी पिसी, हस्सी तूसी..’ आणि हेच मुख्य गाण्याच्या सुरूवातीला वापरण्यात आले. कविता कृष्णमुर्ती यांनी हे शब्दही गाण्याचाच एक भाग वाटावे इतके उत्तम गायले. त्यावर श्रीदेवींनी केलेला अभिनय तर इतका सुंदर होता की या गाण्याच्या सुरूवातीला अर्थहीन वाटणाऱ्या ओळींचा या गाण्यात का समावेश करण्यात आला हा प्रश्न तेव्हा कोणालाही पडला नाही.
काही वर्षांपूर्वी सरोज खान यांचा एका वाहिनीवर ‘नच ले वे’ हा शो आला होता. या कार्यक्रमात सरोज खान यांनी हवा हवाई गाण्यावर प्रेक्षकांना नृत्य शिकवलं होतं. त्यावेळी सरोज खान यांनी हा किस्सा सांगितला होता.