शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही काही दिवसांपूर्वी समोर आला आहे. हा फर्स्ट लूक पाहिल्यावर चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आणखी आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. गेले अनेक दिवस या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार असल्याची चर्चा रंगली होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. नुकतीच या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
आणखी वाचा : मिस ‘पू’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार? करीनाने दिले संकेत
सुपरस्टार विजय सेतुपतीचा प्रवक्ता युवराज याने एक ट्विट करत या चर्चा थांबवल्या आहेत. त्याने केलेले ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या ट्विटद्वारे तो म्हणाला, “विजय सेतुपती हे सध्या फक्त शाहरुख खान यांच्या ‘जवान’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहेत. त्याशिवाय सध्या ते इतर कोणत्याही तेलुगू चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत नाहीये.” यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, एटली कुमार यांच्या चित्रपटाशी संबंधित विजय सेतुपती यांच्या टीमची ही पहिली अधिकृत घोषणा आहे.
‘जवान’ चित्रपटाचे पुढील शेड्युल ऑगस्टच्या अखेरीस चेन्नईमध्ये सुरू होईल. या शेड्युलमध्ये अभिनेता विजय सेतुपतीचाही समावेश असेल. या बातमीनंतर चाहत्यांमध्ये विजय सेतुपतीला वेगळ्या भूमिकेत पाहण्याची उत्कंठा वाढली असून आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
आणखी वाचा : ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर
‘जवान’ या अॅक्शन चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील दिसणार आहे. त्याचबरोबर सान्या मल्होत्रा, राणा डुग्गुबाती आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा रेड चिलीज एंटरटेनमेंटने २२ जून रोजी केली होती. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.