बॉलिवूडमधील ‘बादशाह’ म्हणून ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान ‘वर्ल्ड टूर’द्वारे पुन्हा एकदा आपली रोमान्सची जादू जगभरात पसरविण्यासाठी सज्ज झाला आहे. ही ‘वर्ल्ड टूर’ आपण स्वत:च्या फायद्यासाठी अथवा स्वार्थासाठी करीत नसून, केवळ प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी करीत असल्याचे त्याने म्हटले आहे. १९ सप्टेंबरपासून ह्युस्टनइथून सुरू होणाऱ्या या ‘वर्ल्ड टूर’मध्ये त्याच्याबरोबर माधुरी दीक्षित, मलायका अरोरा खान, गायक हनी सिंग आणि कनिका कपूर इत्यादी कलाकारांचा सहभाग असणार आहेत. सोमवारी मुंबईत पार पडलेल्या हॅपी न्यू इयर चित्रपटाच्या ध्वनिफीत अनावरण सोहळ्यात उपस्थित पत्रकारांनी या शोबाबत अधिक माहितीची विचारणा केली असता शाहरूख म्हणाला, वर्ल्ड टूर मी स्वार्थासाठी करीत नसून, हा शो प्रेक्षकांसाठी आहे. या शोच्या माध्यामातून आम्ही त्यांचे मनोरंजन करणार असल्याचे सांगत शाहरूख पुढे म्हणाला, आम्ही हॅपी न्यू इयर चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या अन्य प्रसिद्ध गाण्यांचादेखील यात समावेश असणार आहे. बोमन आणि फराह दर्दे डिस्को गाण्यावर त्यांच्या सिक्स पॅक अॅब्ससह खास नृत्य करणार असल्याचे तो हसतहसत चेष्टेने म्हणाला. फराह खान दिग्दर्शित हॅपी न्यू इयर चित्रपटात शाहरूख खानशिवाय दीपीका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सुध आणि विवान शाह यांच्यादेखील भूमिका आहेत.

Story img Loader