वीस वर्षांपूर्वी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’चा पहिला शो इतर अनेक चित्रपटगृहांप्रमाणेच ‘मराठा मंदिर’मध्येही झळकला होता. मात्र, त्यानंतर राज आणि सिमरनची ही दास्तान-ए-मोहोब्बत मॅटिनी शोच्या निमित्ताने ‘मराठा मंदिर’च्या हृदयात घर करून बसली होती. थोडेथोडके नव्हे तर १००९ आठवडे एकाच वेळी या चित्रपटाचे सातत्याने खेळ दाखवण्याचा ऐतिहासिक विक्रम कायम केल्यानंतर ‘आजचा शेवटचा खेळ’ अशी पाटी गुरुवारी मराठा मंदिरबाहेर लावण्यात आली होती. मात्र, त्यानंतर चित्रपटप्रेमींनी विविध माध्यमांतून आपला असंतोष व्यक्त केल्यानंतर ‘दिलवाले..’साठी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय मराठा मंदिरने घेतला आहे.
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट गेले आठवडाभर मराठा मंदिरमध्ये सकाळी ९.३० वाजता दाखवला जात होता. आजचा शेवटचा खेळ अशी पाटीही आम्ही लावली होती. त्यानुसार आजपासून चित्रपट पुन्हा न दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. मात्र, त्यानंतर अनेक चित्रपटप्रेमींनी दूरध्वनीवरून आणि इतर माध्यमांमधून या चित्रपटाला सातत्याने प्रेक्षक मिळत असूनही तुम्ही तो बंद करायचा निर्णय का घेतला? अशी विचारणा केली. चित्रपटप्रेमींच्या आग्रहामुळे शुक्रवारपासून आणखी एक आठवडा हा चित्रपट त्याच्या नेहमीच्या वेळी साडेअकरा वाजता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘मराठा मंदिर’चे व्यवस्थापकीय संचालक मनोज देसाई यांनी दिली.
‘दिलवाले..’ दररोज मॅटिनी शो दाखवला जात असल्याने नवीन हिंदी चित्रपटांना दिवसभरात पूर्ण शो मिळत नाहीत. शिवाय, एक हजारपेक्षा जास्त आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहात ‘दिलवाले..’ पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही तुलनेने फारच कमी होती. त्यामुळे चित्रपटाची वेळ बदलून सकाळी साडेनऊला शो दाखवण्याचा प्रयोग करण्यात आला. गेले आठवडाभर साडेनऊ वाजता ‘दिलवाले..’ दाखवण्यात येत होता. मात्र, त्याला प्रेक्षकांकडून अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. अगदी आजच्या शेवटच्या प्रयोगालाही केवळ २१० लोक उपस्थित होते. म्हणून, या चित्रपटाचे शो दाखवणे बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असे मनोज देसाई यांनी सांगितले. यावर प्रेक्षकांनी तीव्र नापसंती दाखवली आहे.
गेल्या वर्षी १९ डिसेंबरला या चित्रपटाने ‘मराठा मंदिर’मध्ये एक हजार आठवडे पूर्ण केले. ‘ विक्रम नोंदवल्यानंतर या चित्रपटाचे खेळ दाखवणे बंद करण्याचा विचार ‘मराठा मंदिर’ व्यवस्थापनाने केला होता. त्या वेळी निर्माता आदित्य चोप्राशी बोलल्यानंतर जितके जास्त दिवस चित्रपट चालवण्याचा विक्रम करता येईल तितका प्रयत्न करावा, असे ठरले होते.