रोहित शेट्टी, काजोल या आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर शाहरूख खान ‘किंग ऑफ रोमान्स’ या त्याच्या नेहमीच्या लोकिप्रय भूमिकेच्या रूपात प्रेक्षकांसमोर येतो आहे. ‘दिलवाले’सारखे उत्तम व्यावसायिक मसाला असलेल्या चित्रपटांची लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेच, असे चित्रपट नाव-पैसा मिळवून देतात जे गरजेचे आहे. तरीही कारकिर्दीच्या या टप्प्यावर ‘दिलवाले’सारख्या चित्रपटांवर मेहनत घेत असताना आता ‘फॅ न’ आणि ‘रईस’ असे वेगळे प्रयोग करण्याची संधी देणारे चित्रपट ही आपली गरज असल्याचे शाहरूख खानने सांगितले.
सरत्या वर्षांत मनोरंजनाचा धमाका उडवून द्यायचा हा शाहरूखचा नेहमीचा कित्ता तो यावेळी ‘दिलवाले’च्या निमित्ताने गिरवतो आहे, मात्र आपले लक्ष पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘फॅ न’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाकडे असल्याचे शाहरूखने ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
साचेबद्ध भूमिका करायला मला स्वत:ला आवडत नाही, असे शाहरूख सांगतो. रोमँटिक हिरोच साकारायचा असता तर कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘बाजीगर’, ‘डर’, ‘माया मेमसाब’सारखे चित्रपट केले नसते, असे तो म्हणतो. प्रत्येक चित्रपटागणिक भूमिकेत वैविध्यपूर्ण काम करता यावे, अशी इच्छा असतेच, पण व्यावासायिक चित्रपटांचेही आपले एक गणित असते आणि ते त्याच पद्धतीने पूर्ण करावे लागतात. ‘रा. वन’ सारखा सुपर हिरोपट करण्यासारखे काही प्रयोग करायचे आहेत, पण अशा चित्रपटांना खूप वेळ द्यावा लागतो. ‘रेड चिली एंटरटेन्मेट’ या आपल्या कंपनीला अॅनिमेशन-व्हीएफएक्स क्षेत्रात मोठं करायचं हे आपलं स्वप्न असल्याचं तो म्हणतो. ‘रेड चिली एंटरटेन्मेट’ची आपली टीम खूप उत्तम असल्याने त्यांच्याबरोबरीने ते काम जोरात सुरू आहे, असे तो म्हणतो.
पन्नाशीत पोहोचलेला हा बॉलीवूडचा ‘बादशाह’ आता कुठे ‘फॅ न’ आणि ‘रईस’सारख्या आशय-तंत्राच्या दृष्टीने त्याच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या असलेल्या भूमिकांवर लक्ष केंद्रित क रतो आहे. बॉलीवूडच्या या ब्रॅण्ड ‘एसआरके’चा वारसा पुढे कोण नेणार? याबद्दल तो विचार करू इच्छित नाही. आपला मुलगा आर्यन याला अभ्यासात जास्त रस आहे आणि त्याने त्याला हवे ते शिक्षण पहिल्यांदा घ्यावे, असाच सल्ला आपण त्याला दिल्याचे शाहरूखने सांगितले. सुहानाला अभिनयात रस आहे, पण त्यांना अभिनय क्षेत्रातच आणण्याची घाई आणि अट्टहासही आपण करणार नसल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांची बदलती अभिरुची, वयानुसार आलेले शहाणपण या सगळ्याचा मिलाफ म्हणून आता बादशाहाने कारकिर्दीला वेगळे वळण देण्याची धडपड सुरू केली आहे. तरीही ‘दिलवाले’ ही त्याची लोकांच्या मनातील प्रतिमा जास्त उजवी ठरते की त्याचे येणारे चित्रपट प्रेक्षकांना जास्त भावतात, याचे उत्तर पुढच्या वर्षभरात नक्की मिळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा