पाच वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच एक असा चित्रपट आला ज्याने भारतीय चित्रपटसृष्टीलावेगळी दिशा दिली. तो चित्रपट म्हणजे राही अनिल बर्वे या हरहुन्नरी दिग्दर्शकाचा ‘तुंबाड’. चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ या दिवशी प्रदर्शित झाला अन् मी तो दुसऱ्या आठवड्यात पाहिला त्यानंतर तब्बल ३ वेळा मला तो मोठ्या पडद्यावर अनुभवता आला. ‘तुंबाड’ने भारतीय मनोरंजनविश्वासाठी एक वेगळा कप्पाच जणू निर्माण करून दिला. तोवर अशा प्रकारचं कथानक बघणं तर सोडाच पण असं काही पाहायला मिळेल असा विचारसुद्धा भारतीय प्रेक्षक करण्याच्या मनस्थितित नव्हता अन् अशात ‘तुंबाड’ त्यांच्यासमोर आला. अर्थात तो लगेच पचनी पडणं कठीणच होतं पण केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने जो इतिहास रचला, जी कामगिरी केली ती उल्लेखनीय अशीच होती.
‘तुंबाड’ यशस्वी झाला पण त्यानंतर या चित्रपटामागील एक एक गोष्टी उलगडत गेल्या. हा चित्रपट नेमक्या कोणत्या आणि कशा परिस्थितीतून निर्माण झाला, तब्बल ८ वर्षं या चित्रपटापायी दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांची झालेली फरफट, वैयक्तिक आयुष्यात येणारी वळणं, स्वतःला एक फिल्ममेकर म्हणून सिद्ध करण्यासाठी व आपल्याला जी कथा सांगायची आहे ती आपल्याच पद्धतीने सांगायचा, दाखवायचा अट्टहास या आणि अशा कित्येक गोष्ट हळूहळू लोकांसमोर आल्या अन् तेव्हा कुठे राही अनिल बर्वे हे नेमकं रसायन काय याची माहिती प्रेक्षकांना झाली.
आणखी वाचा : Photos : केवळ ५ कोटींचे बजेट असलेला ‘तुंबाड’ कसा घडला?
सुप्रसिद्ध मराठी लेखक व कथाकार अनिल बर्वे व प्रेरणा बर्वे या दाम्पत्याच्या पोटी ४ जून १९७९ रोजी राही बर्वे यांचा जन्म झाला. साडे तीन वर्षाच्या होईपर्यंत काहीच बोलू न शकणाऱ्या या मुलाबद्दल आई-वडील चांगलेच चिंतेत होते. डॉक्टरांनाही हे मूल नेमकं का बोलत नाही याचे निदान करता येत नव्हते. एके दिवशी आई-वडील त्यांच्या दोन्ही मुलांना घेऊन संभाजी पार्कात फिरायला गेले, तिथे लहानग्या राहीने हत्ती पाहिला, रात्री घरी येऊन जेव्हा निजानीज झाली तेव्हा मध्यरात्री झोपेतून उठून राही चक्क बोलू लागला. तो म्हणाला, “आई मला हत्तीची भीती वाटते.” त्यावेळी त्या लहानग्या मुलाच्या तोंडून मोत्यासारखे सांडणारे शब्द ऐकून आई-वडील दोघेही निर्धास्त झाले. लहानपणी फक्त बोलण्यासाठी एवढा संघर्ष करणारं हे मूल पुढे जाऊन भारतीय चित्रपटाची परिभाषाच बदलेल असं कोणालाची वाटलं नव्हतं.
अर्थात राही यांना घरातूनच मिळालेला वैचारिक, सांस्कृतिक व कलेचा वारसा पाहता ते लेखनाकडे वळणार नाहीत असं कधीच कुणालाही वाटलं नव्हतं. वडील लेखक, आजोबा शाहीर अमर शेख हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी जोडलेले, यामुळे राही यांच्यावर विचारांचे, कलेचे संस्कार लहानपणापासूनच झाले. राही यांच्या मावशी व लेखिका मलिका अमर शेख यांचं लग्न कवि व दलित कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांच्याशी झाले होते. एकूण संपूर्ण कुटुंबच या क्षेत्राशी जोडलेलं असल्याने राही यांचीदेखील याच क्षेत्रात रुचि निर्माण झाली. लहानपणी बोलण्यासाठीचा संघर्ष ते आपल्याला हवाय तसा अन् त्याच पद्धतीने चित्रपट सादर करण्यासाठीचा संघर्ष, हा संघर्ष काही केल्या राही यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हता.
२००८ मध्ये राही बर्वे यांनी त्यांच्या ‘मांझा’ या पहिल्या लघुपटावर काम सुरू केलं. झोपडपट्टीत राहणारा एक गरीब अनाथ व अज्ञात मुलगा, त्याची बहीण आणि एक विकृत मानसिकतेचा पोलिस अधिकारी या तीन पात्रांना घेऊन बांधलेली ही गोष्ट राहीने अत्यंत कमी पैशात एका वेगळ्याच ढंगात सादर केली. एकूणच हा विषय, सादरीकरण, अभिनय या सगळ्याचं प्रचंड कौतुक झालं. इतकं की ‘स्लमडॉग मिलियनेअर’ या ऑस्करप्राप्त चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी या लघुपटाची दखल घेतली. आपल्या चित्रपटाच्या ब्लु-रे डीव्हीडीच्या माध्यमातून डॅनी यांनी ‘मांझा’ लघुपट उल्लेखनीय कामगिरी म्हणून सादर केला आणि राही बर्वे हे नाव थोडं परिचयाचं झालं. आजही राही यांचा हा लघुपट कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. आंतरराष्ट्रीय कलाकारांनी दखल घेऊनसुद्धा २०१८ मध्ये राही बर्वे यांना फिल्ममेकर म्हणून खरी ओळख ‘तुंबाड’ने दिली.
आणखी वाचा : ‘तुंबाड’ मराठीत का केला नाही? दिग्दर्शक राही बर्वेंनी दिलेलं उत्तर; म्हणाले, “मला प्रचंड संताप…”
‘तुंबाड’साठी राही यांनी घेतलेली मेहनत, ठिकठिकाणी जाऊन केलेली रेकी, सासवडचा वाडा अन् पावसाळ्यादरम्यानचे सीन्स शूट करण्यासाठी ताटकळत राहणे, ८ वर्षं सतत निर्माते बदलणे, लाखों करोडो रुपयांचे नुकसान, इंडस्ट्रीकडून होणारी हेटाळणा, आईला झालेला ब्रेन ट्यूमरसारखा दुर्धर आजार, स्वतःला आलेलं अर्धवट बहिरेपण, दिवाळखोरी जाहीर करणं अशा कित्येक अग्नीदिव्यातून पार पडत राही यांनी २०१८ साली ‘तुंबाड’ लोकांच्या स्वाधीन केला अन् लोकांनीच तो सुपरहीट केला. जी चित्रपटसृष्टी ‘तुंबाड’च्या कथेपासून लांब पळत होती त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यावर इंडस्ट्रीलासुद्धा याची दखल घेणं भाग ठरलं.
‘तुंबाड’चं यशस्वी होणं चित्रपटसृष्टीसाठी जितकं महत्त्वाचं होतं तितकंच राही बर्वे यांच्यासाठीही तितकंच महत्त्वाचं होतं. चित्रपटावर लागलेले पैसे आणि आर्थिक गणितं हा एक भाग आहेच पण याहीपलीकडे जाऊन या क्षेत्रात एक स्वतंत्र शैलीतील (Genre) चित्रपट निर्माण करण्यात राही बर्वे यांच्या ‘तुंबाड’चा सिंहाचा वाटा आहे. खुद्द राही बर्वे यांनीच एका जुन्या मुलाखतीमध्ये सांगितलं की ‘तुंबाड’ ही वैश्विक कथा आहे, तिला भाषेचं, देशाचं अन् इतर कसलंच बंधन नाही. जगाच्या पाठीवर कोणत्याही कोपऱ्यात ही कथा आजही तितकीच रिलेटेबल असेल. अशा हटके विषयांचं सादरीकरण चित्रपटांच्या माध्यमातून करू इच्छिणाऱ्या भविष्यातील कथालेखकांसाठी व फिल्ममेकर्ससाठी ‘तुंबाड’ने नवे दरवाजे खुले करून दिले. फक्त एवढंच नव्हे तर हे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्याही यशस्वी होऊ शकतात हा आत्मविश्वासही राही बर्वे यांनी दिला. जर तुम्ही तुमच्या कथेशी, तुमच्या कलेशी प्रामाणिक राहून कोणतीही तडजोड न करता ठामपणे एखादी गोष्ट सांगू पहात असाल तर त्याची चांगली फळं तुम्हाला मिळतातच हे ‘तुंबाड’ने आणि राही अनिल बर्वे या अवलियाने सिद्ध करून दाखवलं आहे.