एसएस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होऊन जवळपास सात वर्षे झाली आहेत, मात्र आजही या चित्रपटाची आणि अभिनेता प्रभासची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. ‘बाहुबली’ नंतर, एसएस राजामौली यांनी ‘बाहुबली २’ प्रेक्षकांसाठी आणला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. पण आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यावरून एक-दोन नव्हे तर ‘बाहुबली’ चित्रपटाचे तब्बल ३६ सीन्स हॉलिवूड चित्रपटांतून कॉपी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
ट्विटरवर एका युजरने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘बाहुबली’च्या पहिल्या भागातील तमन्ना भाटियाच्या सीनची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तमन्नाच्या भोवताली फुलपाखरं दिसत आहेत. हा व्हिडिओ कोलाजमध्ये बनवण्यात आला असून त्याच्या दुसऱ्या बाजूला ‘अवतार’ चित्रपटातील असाच सीन दाखवण्यात आला आहे. याशिवाय, प्रभासने धनुष्यबाणाने निशाणा साधण्याचा एक सीनही व्हिडिओमध्ये आहे आणि या सीनची तुलना ‘अॅव्हेंजर्स’ चित्रपटातील एका सीनशी करण्यात आली आहे. दोन्ही सीन्समध्ये बरंच साम्य आहे.
आणखी वाचा- “हा चित्रपट केवळ…” रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर एस. एस. राजामौलींची पहिली प्रतिक्रिया
या चित्रपटात प्रभासने तलवारही चालवली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार चित्रपटातील हा सीन ‘हरक्यूलिस’ चित्रपटातील एका सीनची नक्कल आहे कारण दोन्ही सीन्समध्ये बरेचसे साम्य आहे. ‘बाहुबली’मधला प्रभासचा माउंटन वॉटरफॉल सीन खूप आवडला होता. एका सीनमध्ये तो डोंगर आणि धबधब्यामध्ये अडकतानाही दिसत होता. ही सीनही हॉलिवूडच्या ‘किंग काँग’ चित्रपटातील सीनशी साधर्म्य दाखवतो.
आणखी वाचा- “त्याला ‘ब्रह्मास्त्र’चा अर्थही माहीत नाही…” विवेक अग्निहोत्रींनी उडवली अयान मुखर्जीची खिल्ली
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत आणि अनेकजण बॉलिवूडला ट्रोल करणाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘साऊथची बाजू घेणारे लोक आता कुठे गेले आहेत?’ तर दुसर्या एका युजरनं लिहिलं, ‘हे सर्व हॉलिवूड चित्रपट पाहिले आहेत तरीही हे साम्य कधी समजलं नाही.’ दरम्यान काही युजर्सनी मात्र ‘बाहुबली’ला पाठिंबा दिला आहे. हे सर्व चित्रपट ‘बाहुबली’ नंतर प्रदर्शित झाल्याचा दावा अनेकांनी केला.