एसएस राजामौली यांनी १९ सप्टेंबर म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर एका मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली. राजामौली लवकरच एक बायोपिक घेऊन येणार आहेत. हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा बायोपिक नसून भारतीय चित्रपटाचा बायोपिक असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मेड इन इंडिया’ असेल.
राजमौली स्वतः याचं दिग्दर्शन करणार नसून ते या चित्रपटात निर्माते व प्रेझेंटर म्हणून भूमिका निभावणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत. याबद्दल ट्वीट करत एसएस राजामौली म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा ही कथा ऐकली तेव्हाच मला ती प्रचंड आवडली. बायोपिक बनवणं अवघड आहे, पान भारतीय चित्रपटाच्या जनकावर बायोपिक बनवणं ही त्याहून अधिक आव्हानात्मक आहे.”
आणखी वाचा : “मी कोमात होतो, माझी दृष्टी गेलेली…” मनोज जोशींनी सांगितल्या ‘देवदास’च्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी
हा चित्रपट जरी भारतीय चित्रपटाचा बायोपिक असला तरी ‘भारतीय चित्रपटांचे जनक’ म्हणजेच दादासाहेब फाळके यांच्यावर बेतलेला असेल असं खुद्द राजामौली यांनी स्पष्ट केलं आहे. भारतात त्यांनी कशाप्रकारे चित्रपट बनवण्याची एक फॅक्टरीच दादासाहेब फाळके यांनी सुरू केली तो संपूर्ण प्रवास आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतो.
अद्याप ‘मेड इन इंडिया’ या चित्रपटात नेमकं कोण मुख्य भूमिकेत असणार आहे याबद्दल माहिती समोर आलेली नाही. एसएस राजामौली यांचं नाव या चित्रपटाशी जोडलं गेल्याने हा चित्रपट एका मोठ्या बजेटमध्ये बनवला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.