एसएस राजामौली हे भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक आहेत. याची दखल बाहेरच्या देशांनीही घेतली आहे. यंदा राजामौली यांच्या ‘आरआरआर’चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. एवढंच नाही तर जगभरात राजामौली यांच्या या चित्रपटाची दखल घेतली. राजामौली यांच्यासारखा दिग्दर्शकाने प्राचीन भारतीय संस्कृतीवर आणखी चित्रपट काढावे अशी मागणी सोशल मीडियावर सतत होताना दिसते.
नुकतंच एका इवेंटदरम्यान राजामौली यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’बद्दल भाष्य केलं आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी राजामौली यांनी ‘महाभारत’वर चित्रपट काढायची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा त्यांनी यावर भाष्य केलं आहे. ‘महाभारत’ नेमकं कसं सादर करायची इच्छा आहे यावर राजामौली यांनी भाष्य केलं आहे. आजवर महाभारताबद्दल जेवढं लिखाण केलं गेलं आहे त्यांचं राजामौली वाचन करणार आहेत.
आणखी वाचा : “गेली १३-१४ वर्षं मी रात्री…” मनोज बाजपेयी यांनी सांगितलं त्यांच्या फिटनेसमागचं रहस्य
याविषयी सविस्तर बोलताना राजामौली म्हणाले, “जर मी आज ‘महाभारत’ बनवायचा निर्णय घेतला तर त्यासंदर्भात मला वाचन करण्यातच वर्षं जाईल. सध्या याबाबत बोलायचं झालं तर हा चित्रपट १० भागात बनू शकतो एवढा हा मोठा विषय आहे. मी आजवर जे चित्रपट बनवले आहेत त्यातून मी कायम शिकत आलो आहेत. याच शिकवणीचा वापर मी ‘महाभारत’ बनवताना करेन.”
राजामौली पुढे म्हणाले, “मी महाभारतासाठी जेव्हा पात्रं लिहिन ती तुम्ही आजवर पाहिलेल्या पात्रांप्रमाणे नसतील. कथेचा मूळ गाभा तोच असेल, पण या पात्रांच्या नातेसंबंधांवर विस्तृतपणे भाष्य करणार आहे. मला माहीत आहे प्रेक्षकांनी आधीच कोणता कलाकार कोणतं पात्र साकारणार याबद्दल चर्चा सुरू केली आहे. मी जेव्हा ती पात्रं लिहिन तेव्हाच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकेन.” राजामौली यांच्याशिवाय ‘दंगल’ चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हेसुद्धा ‘रामायण’ या महाकाव्यावर चित्रपट करत आहेत.