‘बिग बजेट’ मुव्ही म्हटल्यावर अनेकजण एकाच चित्रपटाचं नाव उच्चारतात, तो चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’. शोबू यार्लागड्डा, एस.एस. राजामौली, साबु सिरियल यासारख्या पट्टीच्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी अभिनेते- अभिनेत्रींची फौज एकत्र करत देशातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रपटाचं सादरीकरण केलं. प्रभास, राणा डग्गुबती, सत्यराज, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन या कलाकारांच्या साथीने राजामौलींनी एक भव्यदिव्य कथानक त्याच ताकदीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. २८ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत चांगलीच कमाई केली आहे. अवघ्या सहा दिवसांमध्ये या चित्रपटाने जगभरात ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच त्याच्या कमाईचे आकडेही वाढतच जात आहेत. याच धर्तीवर बाहुबलीतील मुख्य कलाकारांचं मानधन किती असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. काही संकेतस्थळांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या कलाकारांच्या मानधनाचा आकडा वाचून तुम्हालाही धक्काच बसेल.
बाहुबली- प्रभास
अथक प्रयत्नांनी बाहुबलीचं पात्र प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रभासला २५ कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे.
भल्लालदेव- राणा डग्गुबती
या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणारा भल्लालदेव म्हणजेच राणा डग्गुबतीला १५ कोटी रुपये इतकं मानधन देण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे राजामौलींच्या ‘बाहुबली २’ या चित्रपटामध्ये राणाच्या भूमिकेनेही प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली.
देवसेना- अनुष्का शेट्टी
‘बाहुबली’ चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये डीग्लॅम लूकमध्ये दिसलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी ‘बाहुबली २’ मध्ये एका राजकन्येच्या भूमिकेत दिसते आहे. या चित्रपटासाठी तिला ५ कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे.
कटप्पा- सत्यराज
‘बाहुबली’ या चित्रपटातील कोणा एका पात्रावर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या असतील तर तो म्हणजे कटप्पा. कटप्पाने बाहुबलीला का मारलं…? किंबहुना या एका प्रश्नामुळेच बाहुबलीबद्दल इतकी उत्सुकता पाहायला मिळाली होती. अशा या कटप्पा म्हणजेच अभिनेता सत्यराजला मानधनाच्या स्वरुपात २ कोटी रुपये मिळाले आहेत. सत्यराजला मिळालेलं हे मानधन पाहता ते अगदी कमी असल्याची प्रतिक्रिया काही चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
अवंतिका- तमन्ना भाटिया
चौकटीबाहेरील भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटियाला या चित्रपटासाठी ५ कोटींचं मानधन देण्यात आलं आहे.
शिवगामी देवी- रम्या कृष्णन
राजमाता शिवगामी देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रम्या कृष्णनला या भूमिकेसाठी २.५ कोटी इतकं मानधन देण्यात आलं आहे.
विविध हिंदी आणि इंग्रजी वेबसाईट्सवर या मानधनाचे वृत्त देण्यात आले आहे. यासंदर्भात निर्मात्यांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.