आपल्याकडील नाटकांना फार मोठी परंपरा आहे. हौशी कलाकारांनी ही कला जोपासायला सुरुवात केली. कालांतराने कंत्राटी प्रयोग सुरू झाले आणि त्यामधून निर्माते घडत गेले. त्या वेळी निर्मितीप्रमुख आणि व्यवस्थापक उदयाला आले. संहिता ऐकल्यापासून ते नाटक रंगभूमीवर येईपर्यंतची सर्व व्यवस्था पाहायचे काम निर्मितीप्रमुख करायचे. नाटक रंगभूमीवर आल्यावर सर्व जबाबदारी व्यवस्थापक पाहायचे. पण सध्याच्या घडीला निर्मितीप्रमुखही दिसत नाहीत आणि व्यवस्थापकही. काही वर्षांपासून रुजली ती सूत्रधार ही संकल्पना.

सूत्रधार हे सध्याच्या जगातलं व्यवस्थापकाचं दुसरं रूप असल्याचंही काही जण म्हणतात. पण सूत्रधाराच्या हातात नाटकाची सूत्रं असतात, या गोष्टीशी बरेच जण सहमत आहेत. नाटकाची प्रसिद्धी असेल, कलाकारांच्या, नाटय़गृहांच्या तारखा मिळवणं, दौरे ठरवणं, दौऱ्यातील सर्व व्यवस्था पाहणं, कोणत्या दिवशी प्रयोग केला तर जास्त प्रतिसाद मिळू शकेल, हे निर्मात्यांना सांगणं, गाडय़ांची व्यवस्था यांसारख्या अनेक गोष्टी सूत्रधार पाहतात. नाटकांच्या जाहिरातीमध्ये आपण सारेच सूत्रधारांची नावं पाहतो. पण ते नेमके काय करतात किंवा त्या व्यक्तींचे आतापर्यंतचे योगदान काय, हे आपल्याला माहीत नसते. कारण त्यांचे नाव कधीही चर्चेत आलेले नसते. नाटकासाठी झटणारा हा महत्त्वाचा दुवा मात्र प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहिलेला आहे.

गोटय़ा सावंत.. या क्षेत्रातील सर्वात अनुभवी व्यक्ती. सध्याच्या घडीला आठ-नऊ नाटकांचे ते सूत्रधार आहेत. सावंत यांच्याकडे नाटय़सृष्टीतला जवळपास ४७ वर्षांचा अनुभव आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्था त्यांच्याकडे आहेत. नाटय़ व्यवसायात एवढी वर्षे असल्यामुळे बऱ्याच निर्मिती संस्था सावंत यांच्याकडे आपसूकच जातात.

‘नाटकाचा सूत्रधार असणे, फार जिकिरीचे आहे. कारण निर्मात्याचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास असावा लागतो. तुम्ही जो काही निर्णय घेता त्याचा परिणाम नाटकासहित आर्थिक गणितांवर होणार असतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलावे लागते. पैसे कमी करण्याबरोबर एखादा प्रयोग रद्द करण्याचा अधिकारही सूत्रधाराकडे असतात,’ असे सावंत सांगतात.

जवळपास २० वर्षे सुरेंद्र दातार हे मोहन वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. पण ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस’पासून आता नव्या संचात आलेल्या ‘घाशिराम कोतवाल’ या नाटकाचे सूत्रधारपद त्यांनी सांभाळले आहे. त्यांना व्यवस्थापक आणि सूत्रधार या दोन्ही भूमिकांमध्ये जास्त फरक जाणवत नाही. ‘पूर्वी मी २० वर्षे व्यवस्थापक होतो, आता काही नाटकांमध्ये सूत्रधाराची भूमिका पाहत आहे. पण सूत्रधाराचे काम हे व्यवस्थापकापेक्षा जास्त काही भिन्न नसते, आता त्याचे वेगळे नामकरण झाले आहे एवढेच,’ असे दातार सांगतात.

१९९४ साली कपडेपट, नेपथ्य करण्यापासून श्रीकांत तटकरे यांनी सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत जवळपास ३५ नाटकांचे सूत्रधारपद त्यांनी सांभाळले आहे. निमित्त या निर्मिती संस्थेच्या ‘तू सुखकर्ता’ या नाटकापासून त्यांनी ही भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यानंतर एकदंत, नाटय़संपदा कलामंच, साज एंटरटेन्मेंट, अथर्व या निर्मिती संस्थाकडे त्यांनी सूत्रधाराचे काम केले आहे. सध्या सुरू असलेल्या ‘९ कोटी ५७ लाख’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ यांचे सूत्रधारपद त्यांच्याकडे आहे. ‘सूत्रधाराची भूमिका वठवणं सोपं नसतं. एका वेळेला ४-५ नाटकं सुरू असताना तुम्हाला मानसिकरीत्या खंबीर असावं लागतं. नाटकाचं उत्तम मार्केटिंग कसं करता येईल, हे चांगल्या सूत्रधाराला माहिती असावं लागतं. तुम्ही एका जागी किंवा कार्यालयात बसून हे काम करू शकत नाही,’ असं तटकरे यांना वाटतं.

मंगेश कांबळी हे जवळपास ४५ वर्षांपासून नाटय़सृष्टीमध्ये आहेत. १९७८-८८ या कालावधीत ते बाळ कोल्हटकर यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून कामाला होते. त्या वेळी नेपथ्य, संगीत देण्याबरोबर नाटकातील लहानसहान भूमिकाही करायचे. त्यानंतर त्यांनी भद्रकाली, सुयोग आणि आता प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनमध्ये ते व्यवस्थापकाचं काम करतात. पण त्याचबरोबर त्यांनी ‘छडा’ आणि ‘ग्रेसफूल’ या दोन्ही नाटकांचे सूत्रधारपदही सांभाळले आहे. या व्यवसायात राहण्यासाठी त्यांनी आकाशवाणी, मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिकेतील नोकऱ्यांना पूर्णविराम दिला. आता पूर्णवेळ त्यांनी नाटक व्यवसायाला दिला आहे.

गेल्या २२ वर्षांपासून शेखर दाते हे नाटय़सृष्टीत आहेत. भले स्वत:ला जास्त पैसे मिळाले नाही तरी चालेल पण नाटक चालायला हवं, या ध्येयाने दाते यांनी आतापर्यंत बऱ्याच नाटकांचे सूत्रधारपद सांभाळले आहे. यामध्ये ‘फर्स्टक्लास’, ‘झाकला तरी उजाडला’, ‘दिसता तसा नसता’, ‘कट टू कट’, ‘अनंतकोटी’ (श्री स्वामी समर्थ), ‘तुम्हीच माझे बाजीराव’, ‘शुभ मंगळ सावधान’, ‘चिरंजीव आईस’ याबरोबर काही बालनाटय़ांमध्येही त्यांनी सूत्रधारपद सांभाळले आहे.

नितीन नाईक यांनी दिशा थिएटरच्या ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ या नाटकापासून सूत्रधाराची भूमिका पाहायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी याच संस्थेचं ‘डरना गुन्हा हैं’ हे नाटक केलं. त्यानंतर सुनील बर्वे यांच्या हर्बेरियम संस्थेची बरीच नाटकं त्यांनी पाहिली. सध्याच्या घडीला ‘अमर फोटो स्टुडिओ’ आणि ‘ती फुलराणी’ या दोन नाटकांचे सूत्रधारपद ते सांभाळत आहेत. ‘सध्याच्या घडीला कलाकार आणि नाटय़गृहांच्या तारखांचा मेळ घालणं कठीण होऊन बसलं आहे. नाटक कितीही चागलं असलं तरी ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं लागतं, तरच ते नाटकाला येऊ शकतात. जे नाटक पाहायला येतात त्यांच्याकडूनच नाटकाचे जास्त प्रभावी मार्केटिंग होते. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत जास्तीत जास्त कसं पाहोचता येईल, याचा एक सूत्रधार म्हणून मी जास्त विचार करतो,’ असं नाईक सांगतात.

निर्मात्याने नाटकाला जन्म दिला तर त्याचं बाळंतपण सूत्रधाराला करावं लागतं, असं सध्याच्या घडीला नाटय़सृष्टीत म्हटलं जातं. निर्माते विश्वासाच्या जोरावर सूत्रधारांकडे नाटक सोपवतात, त्यापुढचं सर्व काम सूत्रधार पाहत असतो. सध्याच्या घडीला नाटकातील पैसा ही गोष्ट तूर्तास बाजूला ठेवली तर सूत्रधार हा खऱ्या अर्थाने नाटकाचा बॉस असतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

Story img Loader