नाटय़गृहात एकाच दिवशी होणारे तीन-तीन प्रयोग आता बंद झाले असले तरीही उत्तम संहिता, अभिनय व दिग्दर्शन अशी भट्टी जुळून आली तर या नाटकांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. चांगल्या नाटकांना अजूनही खणखणीत बुकिंग असून अगदी आडवारीही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद अशा नाटकांना मिळतो, अशी प्रतिक्रिया तरुण लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी व्यक्त केली.
नाटकांना हिंदी व इंग्रजी चित्रपट, करमणूक पार्क, करमणुकीचे अन्य कार्यक्रम, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका यांच्याशीही मोठी स्पर्धा करावी लागते. मात्र या स्पर्धेतही आपला प्रेक्षक घराबाहेर पडून मराठी नाटकांना गर्दी करतोय हे आशादायक चित्र असल्याचे सांगून क्षितीज म्हणाले, सध्या सुरू असलेल्या ‘समुद्र’, ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘ढॅण्टढॅण’, ‘छापा काटा’, ‘लव्ह बर्ड्स’ आणि आमच्या ‘दोन स्पेशल’लाही चांगले बुकिंग आहे.
माफक दरात नाटक
प्रेक्षक आणि प्रयोग संख्या कमी होण्यास केवळ वाहिन्यांचे वाढते प्रमाण कारणीभूत नाही तर नाटकांचा घसरलेला दर्जा, सुमार संहिता आणि घाणेरडा अभिनयही यास कारणीभूत आहे. नावाजलेल्या नटांना घेऊन भरमसाट तिकीट लावण्यापेक्षा चांगली संहिता आणि चांगल्या कलाकारांना घेऊन माफक दरात नाटक सादर केले तर प्रेक्षक नक्कीच मोठय़ा संख्येने येतील, असे मत ‘सौ. शशी देवधर’ या चित्रपटाचे गीतकार आशीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
प्रेक्षकांना जर तुम्ही चांगले काही दिले तर सर्व अडथळे पार करून प्रेक्षक नाटकाच्या प्रयोगाला मोठय़ा संख्येत गर्दी करतात हे रंगभूमीवर सध्या सुरू असणाऱ्या काही नाटकांवरून दिसून येत आहे, असेही मत काही जणांनी व्यक्त केले.
मराठी नाटकाला तरुण प्रेक्षक येतोय. नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांचे वय कमी होतेय. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक आज ‘हाऊसफुल्ल’ जाते. ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. हे सगळे चांगले चित्र नाही का? त्यामुळे नाटय़ प्रयोगांना उतरती कळा लागली आहे, असे मला वाटत नाही.
क्षितीज पटवर्धन, ‘दोन स्पेशल’चे लेखक-दिग्दर्शक