हिंदीसह प्रादेशिक वाहिन्यांची एकच गर्दी झाल्याने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी आपल्या एकूणच कार्यक्रमात, आशयात मोठय़ा प्रमाणावर बदल करणे ही आजची गरज झाली आहे. मराठीत असलेल्या इनमिन पाच वाहिन्यांमध्येही रस्सीखेच सुरू आहे. गेल्या काही वर्षांत स्टार समूहाची स्टार प्रवाह वाहिनी चांगलीच स्थिरावली असली तरी आता तरुण पिढीला आणि आजच्या आधुनिक विचारांच्या स्त्रियांचा प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून वाहिनीने आपल्या एकूणच रंगरूपात आणि कार्यक्रमांमध्ये लक्षणीय बदल केला आहे.
निळ्या रंगात चमकणारा ‘स्टार प्रवाह’चा लोगो आता लाल रंगात रंगून निघाला आहे, अशी माहिती वाहिनीचे क्रिएटिव्ह हेड जयेश पाटील यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना दिली. केवळ लोगोच नाही तर वाहिनीवरील कार्यक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने आमच्या संशोधक टीमने सातत्याने विविध प्रेक्षकांशी संवाद साधत एक संशोधन कार्यक्रम हाती घेतला होता. या संशोधनातून आम्हाला असं लक्षात आलं की आजच्या स्त्रीला परंपरा आणि आधुनिकता यांचा योग्य मेळ घालणं सुरेख जमतं. किंबहुना, या दोन्हींचा समतोल साधूनच पुढे जाण्याचा मार्ग आजच्या स्त्रियांनी चोखाळला आहे. आणि परंपरागत गोष्टींची जपणूक करणारी स्त्री आपल्या क र्तृत्वालाही प्राधान्य देते आहे. तिची स्वप्नं, आशाआकांक्षा यापूर्वीपेक्षा अधिक मोठय़ा आहेत. त्यामुळे अशा स्त्रीचे प्रतिबिंब आपल्या कार्यक्रमांमधून उमटले पाहिजे, असा एक विचार घेऊन आम्ही आमच्या कार्यक्रमांची आखणी केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
‘स्वप्नांना पंख नवे’ हे नवे ब्रीदवाक्य स्टार प्रवाह वाहिनीने घेतले आहे. याबद्दल बोलताना, स्त्रियांना आणि तरुण पिढीला तुम्ही मोठी स्वप्नं पाहा. तुम्ही ते साकार क रू शकाल, असा विश्वास आमच्या कार्यक्रमातून द्यायचा आहे, असे जयेश पाटील यांनी सांगितले. या उद्देशाने ‘बे दुणे दहा’ ही एकेरी पालकत्व या विषयावरची नवी मालिका, एकेकाळच्या जिवलग मैत्रिणी. आपल्या करिअरमुळे एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या या मैत्रिणी पुन्हा एका निमित्ताने एकत्र येतात आणि पुन्हा तेच बंध जुळतात.. त्यांची कथा सांगणारी ‘लगोरी’ ही नवीन मालिका स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. याशिवाय, ‘माधुरी मिडलक्लास’, ‘मानसीचा चित्रकार तो’ अशा वेगळ्या मालिकांनीही प्रेक्षकांची पकड घेतली असल्याचे पाटील यांनी सांगितले. सेलिब्रिटी जोडप्यांच्या सहजीवनाची कहाणी सांगणारा ‘सुप्रिया-सचिन’ शोही प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरेल, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा