अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पुढे येऊन पाठिंबा दिला. तर दुसरीकडे राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आलं असल्याच्या आरोपाचं निर्मात्यांनी मात्र खंडन केलं आहे. यातच किरण माने यांनी एक नवी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
अभिनेते किरण माने यांनी काही मिनिटांपूर्वी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी विविध गोष्टींवर भाष्य केले आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे.
किरण माने यांची फेसबुक पोस्ट
“आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रोडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू..… आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच !”
“पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर विश्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगण घालणारे आणि लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुम्ही ठरवा !”
“मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!!,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“त्यांना अनेकदा सूचना देऊनही…”; निर्मात्यांनी स्पष्ट केलं किरण मानेंना मालिकेतून काढण्याचं कारण
“आपल्याकडे एक आणि एकच नेता असा आहे जो…”; शरद पवारांची भेट घेतल्यावर किरण मानेंची प्रतिक्रिया
नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी साडपले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे.