स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत रमा आणि अक्षयच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या या मालिकेत दोघांमधल्या प्रेमाचा आंबट गोड मुरांबा आता मुरायला लागल्याचे पाहायला मिळत आहे. रमाच्या अवखळ आणि निरागस स्वभावाने अक्षयला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे. आता मुरांबा मालिकेत लवकरच प्रेमाचा पाऊस बरसणार आहे.
अक्षय आणि रमाच्या प्रेमाच्या या नात्याची गोड सुरुवात वरुणराजाच्या हजेरीने होणार आहे. सध्या या मालिकेत मुकादम कुटुंब पिकनिकसाठी निघालं आहे. मुसळधार पावसात पिकनिकचा आनंद काही औरच असतो. अशातच पाऊस सुरु होतो आणि पावसात भिजण्याचा मोह रमाला काही आवरत नाही. अक्षयला पावसात भिजायला आवडत नाही. मात्र रमावरच्या प्रेमापोटी अक्षयही पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक आव्हानांचा सामना करत मुरांबा मालिकेच्या संपूर्ण टीमने या खास भागाचं शूटिंग पूर्ण केलं. अक्षय मुकादम ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शशांक केतकरसाठी तर हा सीन खूपच स्पेशल आहे. कारण या सीनच्या निमित्ताने पावसात भिजण्याचा आनंद त्याला लुटता आला.
‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवार अडकली विवाहबंधनात, लग्नाचा व्हिडीओ पाहिलात का?
पाऊस म्हटलं की गरमागरम भजी आलीच. त्यामुळे संपूर्ण टीमने मिळून गरमागरम चहा आणि कांदाभजीचा आस्वाद घेतला. मुकादम कुटुंबाच्या पिकनिकचा हा सीन मढमधल्या एका खास लोकेशनवर करण्यात आला. शशांक केतकरला हे लोकेशन इतकं आवडलं की पुन्हा पुन्हा इथे सीन व्हावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली. त्यामुळे शूटिंगच्या निमित्ताने का होईना संपूर्ण मुकादक कुटुंबाने पिकनिकचा आनंद लुटला. येत्या रविवारी म्हणजेच १० जुलैला दुपारी २ आणि सायंकाळी ७ वाजता हा खास भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.