अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना काढण्यात आल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी त्यांना पुढे येऊन पाठिंबा दिला. तर दुसरीकडे राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आलं असल्याच्या आरोपाचं निर्मात्यांनी मात्र खंडन केलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे.
‘मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेत विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान नुकतंच या मालिकेत माऊच्या वडिलांची म्हणजे विलास पाटील ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी आता स्टार प्रवाह वाहिनीने जाहीर निवदेन दिले आहे.
स्टार प्रवाहचे निवेदन
“मुलगी झाली हो’ या शोमध्ये विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप करणे दुर्देवी आहे.”
“या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला होता. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांचा ते अनादर करायचे. या आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.”
“या तक्रारीनंतर किरण माने यांना अनेकदा समज देण्यात आली होती. पण, माने यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे सेटवरील शिस्त आणि वातावरण बिघडू लागलं. त्यासोबत सहकलाकारांना, त्यातही महिलांना अवमानकारक वर्तणूक मिळत असल्याने त्यांना या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.”
“आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संपूर्ण आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे,” असे जाहीर स्पष्टीकरण स्टार प्रवाह वाहिनीतर्फे देण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मा लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं होतं. अल्पावधीतच हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं. किरण माने हे अनेकदा त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरतोय. अनेकांनी किरण मानेंवर झालेली कारवाई ही चुकीची असल्याचं म्हटलंय. मात्र त्याच वेळेस त्यांच्यावर टीकाही केली जाते आहे.